कौतुक करायची संधीच हिरावून नेली

By Admin | Updated: June 4, 2014 00:24 IST2014-06-03T19:17:54+5:302014-06-04T00:24:17+5:30

गोपीनाथ मुंडे यांचे कौतुक करण्याची तयारी आयएलएस विधी महाविद्यालयातर्फे सुरू करण्यात आली होती. परंतु, काळाने आमच्याकडून ही संधीच हिरावून घेतली, अशी हळहळ आयएलएस विधी महाविद्यालयाने व्यक्त केली.

The opportunity to applaud is to take away opportunity | कौतुक करायची संधीच हिरावून नेली

कौतुक करायची संधीच हिरावून नेली

विधी महाविद्यालयाने व्यक्त केली हळहळ
पुणे : आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी लोकशाही प्रक्रियेतून लोकसभेसाठी विक्रमी मतांनी विजयी होतो, केंद्रीय मंत्रिपदी विराजमान होतो, केवळ महाराष्ट्राचे नाही तर देशाचे नेतृत्व करतो,अशा लोकनेत्याचे व आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे म्हणजेच गोपीनाथ मुंडे यांचे कौतुक करण्याची तयारी आयएलएस विधी महाविद्यालयातर्फे सुरू करण्यात आली होती. परंतु, काळाने आमच्याकडून ही संधीच हिरावून घेतली, अशी हळहळ आयएलएस विधी महाविद्यालयाने व्यक्त केली.
मुंडे यांनी पुण्यातील आयएलएस विधी महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयातील वसतिगृहातच राहून त्यांनी शिक्षणासह राजकीय क्षेत्रातही काम केले. माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख हे सुध्दा आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. महाविद्यालयातून बाहेर पडलेल्या व विविध क्षेत्रात कामगिरी करणार्‍या गुणवंत विद्यार्थ्यांचे महाविद्यालयातर्फे नेहमीच कौतुक केले केले जाते. परंतु, मुंडेंचे भरभरून कौतुक करण्याची संधी महाविद्यालयाला दुर्दैवाने मिळू शकली नाही, याबद्दल प्राचार्या डॉ. वैजयंती जोशी यांनी खेद व्यक्त केला.
महाविद्यालयाचे विद्यार्थी म्हणून मुंडे यांचा नेहमीच अभिमान वाटतो,असे सांगत जोशी म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीतही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. बीडमधून विक्रमी मतांनी विजयी झाल्यानंतर त्यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्रिपद मिळविले. त्यामुळे त्यांचे महाविद्यालयात बोलावून कौतुक करावे, या दृष्टीने प्राथमिक तयारी सुरू केली होती. मुंडे यांना महाविद्यालयातर्फे अभिनंदनाचे पत्रही पाठविले जाणार होते. महाविद्यालयात उपलब्ध असलेली व त्यांच्याशी निगडीत असलेली कागदपत्रेही त्यांना आठवण म्हणून दिली जाणार होती. परंतु,ही धक्कादायक बातमी समजल्यामुळे काय बोलावे, हे सुचत नाही.
मुंडे यांनी १९७२-७३ मध्ये आयएलएस विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यांच्या हस्ताक्षरातील १०२ अनुक्रमांक असलेला प्रवेश अर्ज महाविद्यालयात उपलब्ध आहे,असे सांगत जोशी म्हणाल्या,१९७२-७३ मध्ये तीन वर्षाची एलएलबी व दोन वर्षाची बॅचलर ऑफ जनरल लॉज (बीजीएल)या दोन पदव्या अस्तित्वात होत्या. नोव्हेंबर ७२ ते ऑक्टोबर ७३ या शैक्षणिक वर्षात मुंडे यांनी बीजीएल अभ्यासक्रमास प्रवेश घेतला. परंतु,ते एप्रिल १९७४ मध्ये प्रथम वर्षास उत्तीर्ण झाले. मुंडे हे महाविद्यालयातील वसतीगृहातही वास्तव्यास होते.यासंदर्भातील नोंदही उपलब्ध आहे. मुंडे यांनी प्रवेश अर्जात पालक म्हणून पंडित मुंडे यांचे नाव टाकले होते. शेती हा व्यवसाय तसेच एक हजार रुपये वार्षिक उत्पन्न असल्याचे त्यांनी प्रवेश अर्जात नोंदविले होते.

Web Title: The opportunity to applaud is to take away opportunity