Operation Sindoor Sharad Pawar News: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पहिला वार केला. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांना लष्कराने उद्ध्वस्त केलं. भारतीय लष्कराने मध्यरात्री यशस्वीपणे ऑपरेशन सिंदूर पूर्ण केले. भारताने केलेल्या या कारवाईचे शरद पवारांनी अभिनंदन केले आहे. शरद पवारांनी एक पोस्ट करत लष्करांने केलेल्या कारवाईचे कौतुक केले.
शरद पवारांनी ऑपरेशन सिंदूरनंतर व्यक्त केल्या भावना
शरद पवारांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी भारतीय लष्कारांच्या कर्तृत्वान इतिहासाला उजाळा देत अभिनंदन आणि अभिमान व्यक्त केला आहे.
शरद पवारांनी म्हटलं आहे की, "आपल्या छातीवर गोळ्या झेलून भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्यदलावर प्रत्येक भारतीयाचा पूर्ण विश्वास आहे. आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक करून, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला."
संपूर्ण देशाला सैन्याच्या कामगिरीचा अभिमान
"या कारवाईत पाकिस्तानी नागरिक किंवा पाक लष्कराच्या कोणत्याही ठिकाणाला धक्का न लावता, अतिरेक्यांच्या नऊ लक्ष्यांवर अचूक आणि नियोजित हल्ला करण्यात आला. भारतीय सैन्याच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे", अशा भावना शरद पवारांनी व्यक्त केल्या आहेत.
"भारताचे सार्वभौमत्व आणि नागरिकांची सुरक्षा अबाधित राखणाऱ्या तसेच पहलगाम हल्ल्याचा योग्य प्रत्युत्तर देणाऱ्या सर्व भारतीय जवानांचे मन:पूर्वक अभिनंदन! जय हिंद!", असे शरद पवारांनी म्हटले आहे.
पाकिस्तान झोपेत असतानाच सुरु केलं ऑपरेशन सिंदूर
भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात एक मोठी कारवाई मंगळवारी रात्री केली. ९ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. भारताच्या ऑपरेशन सिंदूरचे व्हिडीओ आणि कारवाईनंतरचे व्हिडीओही आता समोर येत आहे. ज्यात दहशतवाद्यांची आश्रयाची ठिकाणे पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे दिसत आहे. काही व्हिडीओंमध्ये मृतदेहही दिसत आहे.