- प्रज्ञा म्हात्रे/स्नेहा पावसकर,
ठाणे : गणरायाच्या आगमनाच्या आदल्यादिवशी रविवार जोडून आल्याने ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह संपूर्ण जिल्ह्यात खरेदीच्या गर्दीने उच्चांक गाठला. गर्दीतही मधूनच होणारा ‘बाप्पा मोरया’चा गजर आणि खरेदीही भक्तीभावानेच पार पाडणाऱ्या भक्तांचा उत्साह यामुळे या गर्दीलाही श्रद्धेचे कोंदण लाभले होते. गेले दोन-तीन दिवस गणपतीसाठी खरेदीचा उत्साह वाढतो आहे. 30000 टन फुलांची उलाढालगणेशोत्सवात फुलांची खरेदीही तेजीत असते. ताजी फुले मिळावी, यासाठी गणेशोत्सवाच्या एक दिवस आधी सकाळी-सकाळी फुले खरेदी करणे भक्तगण पसंत करतात. ठाण्यातील जुना मार्केट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फुलबाजारात फुले खरेदीसाठी गर्दी होती.एक किलो, दोन किलो, पाच किलो, दहा किलो अशी फुलांची भरघोस खरेदी सुरू होती. मागणी वाढताच दर मात्र अव्वाच्या सव्वा झाले. दर कडाडल्याचा कोणताही परिणाम फुलांच्या खरेदीवर झाला नाही.शनिवारपासून दर कडाडण्यास सुरूवात झाली आणि रविवारी मात्र सुगंधी फुलांच्या दरात वाढ झाल्याचे फुलविक्रेते राजेश रावळ यांनी ‘लोकमत’ला सांगितले. पगाराच्याच दिवसात गणेशोत्सव आल्याने यंदा लोकांचा ‘खिसा गरम’ आहे. त्यामुळे खरेदी करताना यंदा ग्राहक पैशांसाठी हात आखडता घेत नसल्याचे निरीक्षण रावळ यांनी नोंदविले. एरव्ही ठाण्यात दहा हजार टन फुलांची उलाढाल होत असते. परंतु रविवारी आणि सोमवारी सकाळी ही उलाढाल तब्बल तीस हजार टनावर पोचेल, असा अंदाज आहे. रंगीत फुलांबरोबर सुगंधी फुलांची खरेदी गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात असते. केशरी गोंडा, मोगरा, केवडा, दुर्वा-शमीची गणेशोत्सवात सर्वाधिक खरेदी होते. यात केशरी गोंडाला अधिक मागणी असल्याने १० ते १५ हजार टन खरेदी फक्त याच फुलांची झाल्याचे रावळ यांनी सांगितले.पण रविवारी मात्र ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भाईंदर या शहरात आणि मुरबाड, शहापूर तालुक्यात खरेदीच्या गर्दीने उच्चांक गाठला. संध्यकाळनंतर तर बाजारात चालायला जागा नव्हती, अशी स्थिती निर्माण झाली. ठाण्यात स्टेशन ते कोर्टनाक्यापर्यंत गर्दीचा महापूर वाहात होता.>सकाळपासूनच रात्रीपर्यंत गर्दीच गर्दीगणेशोत्सवाचे दिवस जवळ येत होते तसतसा उत्साह वाढत होता. मूर्तीच्या बुकिंगपासून भक्त तयारीला लागले होते. त्यानंतर मखर, मग पुजेचे साहित्य, भटजी, नवीन कपड्यांची खरेदी, मिठाई, प्रसाद अशा नानाविध गोष्टींची खरेदी सुरू होती. हजारो गणेशभक्त रविवारी सकाळपासूनच खरेदीसाठी बाहेर पडले. काहींनी वाहन पार्किंगमध्ये लावून खरेदी करणे पसंती केले होते. वाहने, रिक्षा, गर्दी याने क्षणोक्षणी बाजारपेठ उसळत होती. भर दुपारी एक वाजेपर्यंत रस्ता तुडुंब वाहत होता. दुपारी दोन-तीन तास गर्दी थोडी कमी झाली. पुन्हा चार नंतर गर्दी वाढत गेली. मनसोक्त खरेदी सुरू होती. ठाण्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या स्टेशन रोडवर चालायला जागा नव्हती. गर्दीत चालताना त्रास होत असला तरी गणरायाच्या आगमनाच्या उत्साहापुढे त्याची तमा नव्हती. किरकोळ बाजाराप्रमाणे होलसेल बाजारातही अशीच तुडुंब गर्दी दिसून आली. रविवार रात्री उशिरापर्यंत खरेदी सुरू होती. दुकानांतही झुंबडदुकानांमध्ये दिवसभर विविध वस्तुंच्या खरेदीसाठी झुंबड उडाली होती. कपडे, पुजेची वस्त्रे, पूजेचे साहित्य, प्रसाद, विद्युत तोरणे, मोदक अशा एक ना अनेक वस्तुंची खरेदी अखंड सुरू होती. आधी खरेदी केलेली असली तरी लाडक्या बाप्पाच्या पाहुणचारात कोणतीही कसर राहू नये याच हेतूने गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला अनेकांनी पुन्हा बाजारपेठ गाठली. चालायला जागा नाही, असे म्हणतच अनेक जण गर्दीतून वाट काढत सतत कोणती ना कोेणती खरेदी करत होते. पावसाने रविवारी विश्रांती घेतल्याने खरेदी करणेही सुलभ झाले. बहुतेक जण सहकुटुंब खरेदीसाठी बाहेर पडले होते. त्यातच फेरीवाल्यांनी भर रस्त्यात स्टॉल मांडल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली.