ऑनलाइन लोकमत
कणकवली, दि. 9 - मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव येथे लक्झरीने अल्टो कारला धडक दिल्याने अपघात झाला आहे. या अपघातात कारचे नुकसान झाले असून एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. ही घटना रविवारी सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत अधिक वृत्त असे की, प्रसन्ना चंद्रशेखर वाकडे(23, मूळ अहमदनगर,सध्या रा.गोवा) हा आपल्या ताब्यातील अल्टो कार(क्र. जी.ए. 05-डी- 4517) घेवून गोवा ते राजापुर असा प्रवास करीत होता. ओसरगाव दरम्यान तो कार घेऊन आला असताना गोव्याच्या दिशेने जाणारी लक्झरी(क्र. ए.आर.11-281) त्याच्या कारला घासून गेली. तसेच लक्झरी घेऊन चालक तसाच पुढे न थांबता निघून गेला. त्यामुळे प्रसन्ना वाकडे याने आपली कार वळवून लक्झरीचा पाठलाग केला. तसेच त्याला ओव्हरटेक करून लक्झरीच्या पुढे आपली कार नेऊन उभी केली. त्याचवेळी पुन्हा एकदा अचानक ब्रेक लागू न शकल्याने लक्झरीची धडक कारला बसली.त्यामुळे कारच्या डिकीचे नुकसान झाले असून मागची काचही फुटली आहे. या अपघातात कारचे नुकसान झाले तर कारमधील प्रसन्ना वाकडे याची आई किरकोळ जखमी झाली आहे. या घटनेचा अधिक तपास कणकवली पोलिस करीत आहेत. मात्र, लक्झरी चालक तसेच जखमी महिलेचे नाव समजू शकले नाही.