- ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 20 - श्रावण महिना असल्याने जिभेचे चोचले पुरविण्यास मांसाहारी जेवण बनवण्यास बायकोने नकार दिल्यानंतर संतापलेल्या नवरोबाने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले. यात तो गंभीररित्या भाजला असून आता त्याची मृत्यूशी झुंज सुरु आहे. ही घटना राक्षसभुवन (शनिचे) ता. गेवराई येथे शुक्रवारी रात्री घडली.
धर्मराज बाबासाहेब कोरडे (२६) असे त्या तरुणाचे नाव आहे. पत्नी अरुणा आई- वडील, तीन मुली व एक मुलगा असा त्याचा परिवार असून मोलमजुरी करुन तो कुटुंबाचा गाडा हाकतो. शुक्रवारी रात्री नित्याप्रमाणे तो कामावरुन घरी परतला. येताना त्याने नॉनव्हेज आणले होते. त्याने पत्नीकडे पिशवी सोपवत तिला ते शिजवून देण्यास सांगितटले. यावेळी अरुणाने श्रावण महिना सुरु आहे. त्यामुळे नॉनव्हेज कशाला आणले? ते मी शिजवून देणार नाही, असे स्पष्ट शब्दांत सांगितले. त्यानंतरही त्याने पत्नीकडे हट्ट धरला.पत्नी सतत नकारच देत असल्याने त्याने तिला मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यामुळे ती घरातून बाहेर पडली व शेजा-याच्या घरात लपून बसली.
नॉनव्हेज खायला मिळत नाही म्हणून संतापलेल्या धर्मराजने घरातील रॉकेलची कॅन स्वत:च्या अंगावर ओतली व काडीपेटीने पेटवून घेतले. यानंतर तो ओरडत बाहेर आला तेव्हा शेजा-यांनी व पत्नीने आग विझविली. त्यानंतर तातडीने गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. धर्मराज ६० टक्के भाजला असून उपचार सुरु असल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले.