आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३ : सन २०१७ ते २०२२ या पाच वर्षांसाठी राज्याचे नवीन वस्त्रोद्योग धोरण ठरविण्याची प्रक्रिया सुरू असून, या संदर्भात येत्या ११ मे रोजी मंत्रालयात दुसरी बैठक बोलाविण्यात आली आहे, अशी माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापुरात बोलताना दिली़मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्रमधून राज्यातील कापड उद्योगाला चालना मिळाली, त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी यासाठी कापूस ते कापड निर्मिती प्रक्रियेवर भर देणारे राज्याचे नवे वस्त्रोद्योग धोरण तयार करण्यात येत आहे़ मंगळवारी मंत्रालयाच्या परिषद सभागृहात राज्य वस्त्रोद्योग धोरणासंदर्भात पहिली आढावा बैठक पार पडली़ यावेळी वस्त्रोद्योग प्रतिनिधी उपस्थित होते़ वस्त्रोद्योग महासंघाच्या प्रतिनिधींनी केलेल्या सूचना आणि उपाययोजनांचा सविस्तर अभ्यास करून नव्या धोरणाचा मसुदा तयार केला जाणार आहे़ त्यावर लोकांच्या सूचना, हरकती मागवून सर्वसमावेशक धोरण ठरविण्याचा प्रयत्न असल्याचे मंत्री देशमुख यांनी सांगितले़ यापूर्वी सन २०११ ते सन २०१७ या कालावधीसाठी राज्याचे वस्त्रोद्योग धोरण ठरले होते़ त्यात ४० हजार कोटींची गुंतवणूक आणि ११ लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते़ प्रत्यक्षात १७ लाख ३०४ कोटींची गुंतवणूक झाली असून, २ लाख ६२ हजार रोजगार निर्मिती झाली़ या धोरणाची मुदत ३१ मार्च २०१७ रोजी संपल्याने ३१ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे़ आता नव्या धोरणाची आखणी सुरू आहे़ वस्त्रोद्योग विभागातील उद्योजक, संघटना यांच्याकडून सूचना, अभिप्राय मागविण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले़
राज्याच्या वस्त्रोउद्योग धोरणात ११ लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्टे, सुभाष देशमुख यांची माहिती
By admin | Updated: May 4, 2017 16:30 IST