चैत्यभूमी ट्रस्टचे व्यवस्थापक भंते बी. संघपाल यांचे मतराजरत्न सिरसाट - अकोलाधम्म, आंबेडकर चळवळ राबविताना हेतू शुद्ध असणे गरजेचे आहे. कारण क्षणाक्षणाला मन आणि मत परिवर्तन होत आहे. त्यासाठी मनावर विश्वास ठेवावा लागणार असून, त्याला नैतिकतेची जोड द्यावी लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बौद्ध धम्मातील लोकांनी असा संकल्प केला, तर धम्मचळवळ गतिमान होेईल, असे विचार चैत्यभूमी ट्रस्टचे व्यवस्थापक भंते बी. संघपाल यांनी मांडले भंते बी. संघपाल अकोला दौऱ्यावर आहेत. अकोला तालुक्यातील सांगळूद येथे श्रामणेर शिबिराला आले असताना त्यांनी ‘धम्म चळवळ व डॉ. आंबेडकर जयंती’ या विषयावर खास ‘लोकमत’शी बातचीत केली.धम्म चळवळ पुढे नेण्याचे काम भंते तर करीत आहेत?बी. संघपाल : बरोबर आहे. भंते धम्म चळवळीचे काम करीत आहेत, पण त्याला समाजबांधवांची जोड लागेलच ना़ बौद्ध समाज शिकला, प्रगल्भ झाला, पण वर्तमान स्थिती समाधानकारक नाही. चळवळ सुरू आहे, त्याला गती नाही. त्यांची अनेक कारणे असली तरी हेतू शुद्ध असला तर मात्र चळवळ थांबत नाही; पण येथेच मत, मन परिवर्तन होत असल्याचे निदर्शनास येत आहे.चळवळ दिशाहीन झाले असे वाटते का?बी. संघपाल : असेही काहीसे म्हणता येईल़ कारण धम्म, आंबेडकर चळवळीसाठी आंबेडकरी कवी, गायक, पूर्वजांनी जिवाचे रान केलेले आहे. त्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता समाज, चळवळीला वाहून घेतले होते, टी.एल. शिशूपाल, संजय पवार, श्रीधर ओेव्हळ, गोविंद म्हशीलकर यांनी या चळवळीला गीत, गायनातून मोठं केलं म्हणूनच बाबासाहेब म्हणायचे सभांचं काम हे कवी करीत आहेत. गोविंद म्हशीलकर पोटतिडकीने बाबासाहेबांचे विचार, चळवळ गीतातून मांडायचे, तेव्हा खोकताना त्यांच्या घशातूून रक्त पडायचे. समाजाने त्या वेळी रक्त ओतून ही चळवळ निर्माण केली आहे. कारण उद्याची पिढी ही बाबासाहेबांच्या विचारांची घडेल, असा त्यांना विश्वास होता. पण आज त्यांच्या रक्ताची किंमत समाज विसरत चालला असून, बाबासाहेबांच्या विचाराचा रथ थांबला की काय, असे वाटायला लागले आहे. चळवळ गतिमान करण्यासाठी काय करावे, असे तुम्हाला वाटते?बी. संघपाल - मन चंचल आहे़ त्यावर नियंत्रण मिळविण्याची गरज आहे. त्यासाठी बुद्ध धम्मात पंचशील आहे़ बाबासाहेबांनी २२ प्रतिज्ञा दिल्या आहेत. यांचे तंतोतंत पालन केल्यास मन भटकत नाही़ हेतू ढासळत नाही, त्यासाठी त्याग महत्त्वाचा आहे. पूर्वजांनी आर्थिक स्थिती बघितली नव्हती. समाज परिवर्तनासाठी त्यांनी स्वत:ला चळवळीत झोकून दिले होते़ बाबासाहेबांच्या पुण्याईने समाजातील अनेक लोक चांगली कमाई करीत आहेत. आर्थिक संपन्न झाले आहेत. पण या पैशाचे नियोजन कशासाठी करावे, हेच त्यांना सुचत नाही. समाजाचा विकास साधण्यासाठीचे प्रयत्न अपुरे पडत आहेत़नेमके काय कारण असावे यामागे? बी. संघपाल : खरेतर याला आंबेडकरवादी म्हणणारे राजकीय पक्ष तेवढेच जबाबदार आहेत. बाबासाहेबांच्या पुण्याईने पैसा आला, पण त्याचे नियोजन करता येत नसल्याने समाजातील लोक व्यसनाधिनतेकडे वळत आहेत. समाजातील गरिबांना मदत करावी, होतकरूंना उद्योग सुरू करू न द्यावे, त्याचा उद्योग सुरू झाल्यास तो समाजाला मदत करण्यास पुढे येईल, पण असे होत नसल्याचे चित्र आहे.डॉ. आंबेडकर जयंती कशी साजरी करावी १४ एप्रिल १९५१ रोजी डॉ. बाबासाहेबांचा ६०वा वाढदिवस मुंबईतील परळ येथील दामोदर हॉलमध्ये साजरा करण्याचे कार्यकर्त्यांनी ठरविले होते. या सभेत बाबासाहेब म्हणाले होते, माझा जयजयकार करण्यापेक्षा मी जे सांगतो ते समाजात रुजवा, माझे विचार डोक्यात घ्या, परिवर्तन करा, निष्ठावान कार्यकर्ते घडवा, पण आज सर्व विपरीत सुरू आहे. डीजे, ढोल-ताशे लावून मद्यधुंद अवस्थेत नाचून जयंती साजरी केली जात आहे. हे बदलण्याची गरज असून, समाजातील लोकांंनी हा धोका वेळीच ओळखावा, असे आवाहन बी़ संघपाल यांनी केले़
आंबेडकरी चळवळ राबविताना हेतू शुद्ध असावा!
By admin | Updated: April 14, 2015 01:12 IST