सांगली/तासगाव : तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथील ईगल फायर वर्क्समध्ये फटाके तयार करताना झालेल्या स्फोटातील बळींची संख्या ११ झाली आहे. शिवाजी तुकाराम गुरव (४६) व त्यांचा मुलगा रोहित (१६) यांचा सोमवारी मध्यरात्री मृत्यू झाला.योग्य खबरदारी न घेता व्यवसाय करून ११ लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारखान्याचे मालक रामचंद्र तुकाराम गुरव यांच्यावर तासगाव पोलिसांत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे.कवठेएकंदपासून तीन किलोमीटर अंतरावरील फटाक्यांच्या कारखान्यात सोमवारी सायंकाळी शोभेच्या दारूचे आऊट तयार करताना स्फोट झाला होता. यापूर्वी तीन वेळा स्फोट होऊनही गुरव यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. कामगारांना शोभेची दारू व फटाके तयार करण्याचे प्रशिक्षण दिले नाही. तसेच नियम व अटींचे पालन केले नसल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. स्फोटानंतर मृतांच्या शरीराचे अवयव कारखाना परिसरात पडले होते. (प्रतिनिधी)
फटाके स्फोटातील बळींची संख्या ११
By admin | Updated: May 6, 2015 04:59 IST