नारायण जाधव, ठाणेकेंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार यापुढे २६ जानेवारी, १५ आॅगस्ट आणि इतर राष्ट्रीय उत्सवांदरम्यान प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरण्यास मनाई करण्यात आली आहे़ कोणी प्लास्टिक ध्वज वापरताना आढळल्यास संबंधितांवर राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे़ राष्ट्रध्वजाची विटंबना होणे, बोधचिन्ह व नावे प्रतिबंध अधिनियम १९५० व राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान अधिनियम ६९/१९७१ व क्रमांक ५१/२००५ नुसार कारवाई करण्यात येणार आहे़ विशेष म्हणजे शाळा व महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय उत्सवांदरम्यान प्लास्टिक ध्वज वापरल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्या व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत़राष्ट्रीय उत्सवांच्या काळात प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची मोठ्या प्रमाणात विक्री होते़ शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी कार्यक्रम संपल्यावर हे ध्वज टाकून देतात. त्यामुळे ध्वजाचा अवमान तर होतोच, शिवाय पर्यावरणाचीही हानी होते़ त्यामुळे हिंदू जागृती समितीविरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर या जनहित याचिकेवरील सुनावणी प्रसंगी उच्च न्यायालयाने प्लास्टिक ध्वज वापरण्यास मनाई केली आहे़ त्यानुसार, राज्य सरकारने आदेश दिले आहेत़ केंद्रीय गृहमंत्रालयानेही प्लास्टिक ध्वज वापरण्यास मनाई करण्याबाबत सर्व राज्यांना सूचना केल्या आहेत़ राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागासह शालेय शिक्षण विभागानेही सर्व जिल्हाधिकाऱ्यांसह राज्यातील शाळा-महाविद्यालयांना या आदेशाची सक्तीने अंमलबजावणीच्या सूचना करून अवगत केले आहे़ शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्लास्टिक तसेच कागदी ध्वजांच्या विल्हेवाटीसंदर्भात जिल्हा, तालुका, शहरस्तरावर माहिती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत़
प्लास्टिक ध्वज वापरणाऱ्यांची आता खैर नाही !
By admin | Updated: December 16, 2014 03:36 IST