मुंबई - गृह विभागाच्या अखत्यारीत येणारे आणि कामाची जबाबदारी जवळपास सारखी असूनही पोलीस व ‘कारागृह’ हवालदारांच्या वेतनश्रेणीत असलेली मोठी तफावत दूर करण्यात आली आहे. दोघांनाही आता समान वेतनश्रेणी लागू करण्यात आल्याने गेल्या काही वर्षांपासून कारागृहाच्या हवालदारांवर होत असलेला अन्याय आता दूर झाला आहे.राज्य सरकारने नुकताच स्वतंत्र अद्यादेश काढून सुधारित वेतनश्रेणीचा लाभ जानेवारी महिन्यापासून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील विविध कारागृहांत हवालदार पदावर कार्यरत असलेल्या शेकडो अंमलदारांना त्याचा फायदा होणार आहे.सहाव्या वेतन आयोगामध्ये पोलीस दलातील हवालदारांना वेतन बॅण्ड ५ हजार २०० ते २० हजार २०० आणि ग्रेड वेतन २ हजार ५०० व विशेष ५०० रुपये इतकी तरतूद आहे. तुरुंगातील हवालदार पदासाठी मात्र त्याहून कमी ग्रेड वेतन निश्चित केले होते. त्याबाबत अंमलदारांकडून वारंवार झालेल्या मागणीनंतर जेल प्रशासनाने पोलिसांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. गृह विभागाने त्याला मान्यता दिली असून सुधारित वेतन संरचना लागू केली आहे. त्याचा लाभ कारागृह हवालदारांना जानेवारी २०१८ पासून लागू होणार आहे. मागील चार महिन्यांचा फरक त्यांच्या पुढील वेतनामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
कारागृहातील हवालदारांना आता पोलिसांची वेतनश्रेणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 05:41 IST