कोल्हापूर : केंद्रात, राज्यात सत्तांतर झाले. आता सत्तांतराची ही संधी कोल्हापूर महानगरपालिकेतही आली आहे. या संधीचे सोनं करूया. कोल्हापूर महानगरपालिकेचा कारभार भ्रष्टाचारमुक्त आणि विकासाभिमुख करूया, असा निर्धार बुधवारी कोल्हापुरात झालेल्या ‘मिशन महापालिका’ मेळाव्यात करत शिवसेनेने कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा नारळ फोडला. अंतर्गत गटबाजी दूर करून शिवसेनेच्या वटवृक्षाला नीट आकार देण्यात येईल, असे स्पष्ट क रत मेळाव्यात सर्वच नेत्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसैनिकांना प्रोत्साहित केले. येथील राजर्षी शाहू स्मारक भवनात झालेल्या या मेळाव्यास सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथराव शिंदे, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. या मेळाव्यात १९६६ पासून शिवसेनेत सैनिक म्हणून काम करत पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या सुमारे ४०० शिवसैनिकांचा शाल, फेटा व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. मंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ‘कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. भ्रष्टाचारमुक्त महापालिका आणि विकासाच्या दिशेने जाणारे शहर असा नावलौकीक मिळवून देण्याची संधी आहे. रवींद्र वायकर आणि अरुण दुधवडकर यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या जाणाऱ्या या निवडणुकीत शिवसेनेला नक्की यश मिळेल. पक्षात शिवसैनिक हा पाया असून, त्यांनीच पक्षाची बांधणी केली आहे. काहींना वाटत होते आम्ही म्हणजेच शिवसेना आहे, पण असे म्हणणाऱ्यांची काय अवस्था होते, ते वांद्र्याच्या निवडणुकीत पाहायला मिळाले.’शिवसेनेशी गद्दारी केली त्यांना शिवसैनिकांनी पार धुळीस मिळविले. शिवसैनिक जशी सत्ता मिळवून देतात, तसेच ते पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचा बंदोबस्तही करतात, असे शिंदे म्हणाले. निवडणुका आल्या की राजकीय पक्षांची दुकाने सुरू होतात; पण शिवसेना हा असा पक्ष आहे की त्याचे काम बारा महिने सुरू असते. जनतेला मदतीचा हात दिला जात असतो. कोल्हापुरातही शिवसेना कायम जनतेला न्याय मिळवून देण्यात आघाडीवर आहे, म्हणूनच येथील महानगरपालिकेवर यावेळी भगवा फडकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कोल्हापूर शहराचा विकास ज्या पद्धतीने व ज्या गतीने व्हायला पाहिजे होता तो झाला नाही. इतकी वर्षे सत्ता दिली; पण यांनी कोल्हापूरच्या जनतेला दिले काय? असा सवाल मंत्री रवींद्र वायकर यांनी उपस्थित केला. शिवसेनेच्या आडवे कोणीही आले तरी त्याच्याशी आपणाला सरळ भिडायचे आहे. मित्रपक्ष असलेल्या भाजपवर किती विश्वास आहे, याची आपल्याला कल्पना नसली तरी शिवसेनेवर जनतेचा विश्वास आहे, असे वायकर म्हणाले. महानगरपालिकेवर सत्ता मिळविणे हे आपले स्वप्न असून, त्यासाठी गेली दहा वर्षे आपण सतत जनतेसोबत राहिल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. गेल्या २९ वर्षांतील शिवसेनेच्या वाटचालीचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला. संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार सुजित मिणचेकर, शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रज, शिवाजीराव जाधव यांची यावेळी भाषणे झाली. प्रा. विजय कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)फांद्या छाटा... नको, वटवृक्ष मरेलशिवसेनेतील गटबाजी हा ऐरणीवरील विषय असून, त्याचे पडसाद बुधवारच्या समारंभातही उमटले. जिल्हाप्रमुख संजय पवार यांचा गट या समारंभापासून अलिप्त होता. याचा संदर्भ जोडत अरुण दुधवडकर यांनी, शिवसेनेच्या वृक्षाचे आता वटवृक्षात रूपांतर झाले असले तरी त्यांच्या फांद्या इकडे तिकडे विखुरलेल्या असल्याने त्या छाटून टाकण्याची आवश्यकता बोलून दाखविली. जर वेळीच फांद्या (गटबाजी) छाटल्या, तर येत्या निवडणुकीत शिवसेनेला ५० जागा मिळतील, असेही ते म्हणाले; पण फांद्या विखुरल्या म्हणून त्या छाटणे हे पटणारे नाही, त्यामुळे वटवृक्ष मरण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याला योग्य आकार देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे नव्याने बांधणी करूया, असे रवींद्र वायकर यांनी सांगितले.भाजपला आव्हान शहर विधानसभा मतदारसंघातील ५७ प्रभागांत ४३ ठिकाणी शिवसेनेने, तर भाजपने ७ ठिकाणी आघाडी घेतली आहे. असे असताना मित्रपक्षाचे नेते काय बोलतात हेच कळत नाही. त्यांना एकटे लढायचे असेल तर जरूर लढावे, शिवसेना त्याला घाबरणार नाही, असा इशारा आमदार क्षीरसागर यांनी भाजपला दिला.
चार प्रतिष्ठानांना बजावली एलबीटी वसुलीची नोटीस
By admin | Updated: May 7, 2015 00:09 IST