गुजरातीचा सहारा : प्रचारपत्रकांवर केला वापर
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भाषेवरून जोरदार हल्लाबोल करीत असताना दुसरीकडे मात्र त्यांच्या पक्षाचे माहीम मतदारसंघाचे उमेदवार नितीन सरदेसाई यांचे गुजराती भाषेवरील प्रेम ऊतू चालले आहे. मतांचा जोगवा मागण्यासाठी सरदेसाई यांनी गुजराती भाषेतून पत्रके काढल्याने त्यांचे मराठी भाषेबद्दलचे बेगडी प्रेम चव्हाटय़ावर आले आहे.
मराठी भाषेसाठी आग्रही असणा:या आणि इतरांना मराठीतूनच बोलण्याचे ब्रrाज्ञान सांगणा:या मनसेचा बुरखा विधानसभा निवडणुकीत फाटला आहे. अमेरिकेत बराक ओबामांनी मोदींच्या मातृभाषेत ‘केम छो?’ असं म्हणत त्यांचे स्वागत केले. त्यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषणांमधून टीका केली. एवढेच नव्हे तर भाजपाचे घाटकोपर पूर्व मतदारसंघाचे उमेदवार प्रकाश महेता यांनी आपल्या प्रचाराच्या वाहनावील बॅनर्स गुजराती भाषेत लिहिले आहेत. हे पाहून राज ठाकरे यांच्या अंगाचा तीळपापड झाला. पण आपल्याच पक्षाच्या उमेदवाराने मराठीबहुल मतदारसंघात मतांचा जोगवा मागण्यासाठी चक्क गुजरातीचा वापर केला आहे. याबद्दल राज ठाकरे काय भूमिका घेणार, असा सवाल मतदारसंघातील मराठी भाषिक करीत आहेत. मनसेच्या या दुटप्पी भूमिकेमुळे विरोधकांना आयतीच संधी मिळाली आहे. मनसे उमेदवारांनी गुजरातीमधून पत्रके छापायची तसेच इंग्रजी भाषेतून होर्डिग्ज लावायचे, असे सर्रास प्रकार सुरू असल्याने ‘लोका सांगे ब्रrाज्ञान, स्वत: मात्र कोरडे पाषाण’ अशीच मनसेची अवस्था झाली आहे. उक्ती आणि कृतीमध्ये असाच फरक असल्यास मनसेवर विश्वास ठेवायचा तरी कसा, असा प्रश्न मतदारांना पडला आहे. (प्रतिनिधी)
शिवसेनेचे अजय चौधरीही गुजरातीच्या प्रेमात
शिवसेनेचे शिवडी मतदारसंघाचे उमेदवार अजय चौधरी यांचेही गुजरातीप्रेम समोर आले आहे. मनसे आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष मराठी भाषा जपण्याच्या नेहमी बाता मारतात. पण प्रत्यक्षात मतांची भीक मागण्यासाठी गुजरातीचा आधार घेताना दिसून येत आहेत. जी गुजराती मंडळी महाराष्ट्रात राहतात त्यांना मराठी येतेच. असे असतानाही हे मराठी उमेदवार आपल्या मतदारसंघात गुजरातीचा आधार घेत असल्याने त्यांच्या भूमिकाच आता संशयाच्या भोव:यात अडकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.