कमळ चषक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनावेळी भाषणात भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी एका गावाबाबच वक्तव्य केले होते. यावर या गावकऱ्यांनी नितेश राणे यांना गावात प्रवेश बंदी केली आहे. तसेच याबाबतचे बॅनरही लावण्यात आले आहेत. सध्या सिंधुदुर्गात हे बॅनर चर्चेचा विषय ठरू लागले आहेत.
आनंदवाडी हे नितेश राणे यांच्या मतदारसंघातील गाव आहे. ते देवगड तालुक्यातील आहे. या गावात नितेश राणेंकडून कमळ चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी या गावातील तरुण चोऱ्यामाऱ्यांच्या प्रकरणात असल्याचे वक्तव्य केले होते. यावरून गावकरी संतप्त झाले असण्याची शक्यता आहे.
नुकत्याच झालेल्या देवगड नगरपंचायत निवडणुकीत नगरपंचायत मधील राणेंची सत्ता गेल्यानंतर या ठिकाणी शिवसेना फ्रंट फूट वर आली आहे. या बॅनरवर २२ एप्रिलला रात्री आनंदवाडी गावाची बदनामी करणारे वक्तव्य नितेश राणे यांनी केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे गावाने एकमताने त्यांचा निषेध व्यक्त केला आहे. या आमदारांना तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांना यापुढे गावात प्रवेशबंदी करण्यात येत असल्याचे छापण्यात आले आहे.
यावर नितेश राणे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मला ही माहिती स्थानिक पोलिसांनी दिली होती. कमळ चषकावेळच्या भाषणावर गैरसमज करून घेतला आहे. आनंदवाडीच्या गावाने माझ्यावर बहिष्कार टाकला आहे. मी जो काही चोरीचा आरोप केला आहे त्यात पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार काही मुले ही आनंदवाडीतील आणि काही कणकवलीतील आहेत. माझ्या भाषणातचा उद्देश असा होता, की आज त्या मुलांना पाठीशी घातले तर त्यांचे भविष्य अंधारात जाईल. आनंदवाडीतील ग्रामस्थांसोबत मी याआधी मच्छीमार प्रश्न, स्पर्धा घेतल्या आहेत. जे बोललो ते त्या मुलांच्या आणि गावातील जनतेच्या भल्यासाठी केले आहे, असे ते म्हणाले.