महाड : महाड औद्योगिगक वसाहतीमधील अॅस्टेक लाइफ साईन्सेस कारखान्यातून काल रविवारी झालेल्या वायुगळतीमुळे आणखी नऊ महिला कर्मचाऱ्यांना त्याची बाधा झाल्याने त्यांना एमएमए रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर वायुगळती होऊनही त्याप्रकरणी अद्यापही पोलिसांकडून कारखाना व्यवस्थापनावर वा कारखाना निरीक्षकांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.रविवारी दुपारी अॅस्टेक कारखान्यात उत्पादन सुरू असताना प्रचंड वायुगळती झाली होती़ सपंूर्ण परिसरात धुराचे लोट पसरल्याने त्याचा त्रास आजूबाजूच्या कारखान्यांतील कर्मचारी तसेच परिसरातील ग्रामस्थांना झाला होता. या कारखान्याशेजारीच असलेल्या रेमी फेन लि. कारखान्यातील ८० महिला कर्मचाऱ्यांना या वायूची बाधा झाली होती़ त्यांच्यावर एमएमए रुग्णालयात उपचार सुरू असतानाच रविवारी रात्री याच कारखान्यातील आणखी नऊ महिला कामगारांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले.वायुगळतीबाबत कारखाना व्यवस्थापनही कोणताही खुलासा करू शकले नाही, तर कारखान्यातील सुरक्षितता व्यवस्थेचाही चांगलाच बोजवारा उडाल्याचे यातून स्पष्ट दिसून आले आहे. यावर काय कारवाई केली जाते याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान सुप्रीया गावंडे, उज्ज्वला काळे, शीतल कदम, आरती थोरात, वृषाली तांबडे, संगीता गायकवाड, शुभा गायकवाड, सुनीता झांजे या वायुबाधा झालेल्या महिला कामगारांवर उपचार सुरू आहेत. (वार्ताहर)
आणखी नऊ महिला कर्मचा-यांना बाधा
By admin | Updated: April 7, 2015 04:29 IST