- सोमनाथ खताळ, लोकमत न्यूज नेटवर्कबीड/पुणे : राज्यातील आरोग्य सेवेत काम करणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत असलेल्या सुमारे ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. त्यांचे ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांचे वेतन थकले आहे. दिवाळी तोंडावर असताना वेतन न मिळाल्याने हे कर्मचारी'दिवाळी कशी साजरी करणार?' असा संतप्त सवाल विचारत आहेत. अनेकांनी पुरवून पुरवून पैसे वापरले आहेत. तरीही महागाई आणि इतर खर्च यामुळे खिशात आता काहीच शिल्लक राहिलेले नाही. यामुळे लोक दिवाळी साजरी करणार, आम्ही त्यांच्याकडे पाहत रहायचे का, असा सवाल एनएचएमचे आरोग्य अधिकारी, कर्मचारी विचारत आहेत.
विविध मागण्यांसाठी NHM कर्मचारी गेल्याच महिन्यात बेमुदत संपावर गेले होते. यावेळी राज्य सरकारने त्यांच्या १३ पैकी १० मागण्यांना तत्वतः मान्यता दिली होती. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी लेखी आश्वासन दिले होते. याला आता महिना उलटून गेला आहे. परंतू, या एनएचएम कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगाराचे पैसे काही आलेले नाहीत. ती १० टक्के पगारवाढ राहुद्या, मूळ पगार तरी द्या, असे म्हणायची वेळ या कर्मचाऱ्यांवर आली आहे.
आरोग्य विभागात रिक्त असलेल्या पर्दावर हे १२ हजार समुदाय आरोग्य अधिकारी आणि २० हजार इतर कर्मचारी काम करतात. या कर्मचाऱ्यांना कधीच नियमित वेतन मिळालेले नाही. दोन महिन्यांचे, तीन महिन्यांचे असे वेतन दिले जाते. यामुळे एकदा का हे पेमेंट आले की हे कर्मचारी ते पुढील दोन-तीन महिने पुरवून पुरवून वापरतात. परंतू, आता दिवाळी दोन दिवसांवर आली तरी त्यांना पगार आलेला नाही. या कर्मचाऱ्यांना बोनस तर मिळतच नाही. मग दिवाळी कशी साजरी करायची? असा मोठा प्रश्न या कर्मचाऱ्यांसमोर आवासून उभा आहे.
इन्सेंटीव्ह तर दूरच राहिला...
या कर्मचाऱ्यांना केलेल्या कामाचा इन्सेंटीव्ह दिला जातो. तो तर कित्येक महिने मिळालेलाच नाहीय. पगार वेगळा आणि इन्सेंटीव्ह वेगळा. परंतू, दोन्ही न आल्याने आता या कर्मचाऱ्यांच्या खात्यात ठणठणाट आहे. अशातच स्वत:ला नाही निदान मुलांना तरी दिवाळीचे कपडे घ्यावे लागतील, काहीतरी फराळ, गोडधोड करावे लागेल. फटाके घ्यावे लागतील. या चिमुकल्यांनी पाहुण्यांच्या अन् शेजाऱ्यांच्या तोंडाकडे पाहत बसायचे का, असाही सवाल एनएचएम कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
माझ्या खात्यात ३६६५ रुपये, दिवाळीत काय करू...एनएचएम कर्मचाऱ्यांची खूपच केविलवाणी अवस्था या सरकारने करून ठेवली आहे. सर्व प्रकारची कामे या कर्मचाऱ्यांकडून करून घेतली जातात. परंतू, त्यांच्या कामाच्या मोबदल्याचे पैसे द्यायची वेळ आली की यांच्याकडे निधी नसतो. एका महिला कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, माझ्या खात्यात आता ३६६५ रुपयेच उरले आहेत, दिवाळीत काय करू, यांनी आणखी महिनाभर पगार दिला नाही तर काम तरी कसे करणार? असा सवाल केला आहे.
Web Summary : NHM contract workers in Maharashtra face hardship with Diwali near, as they haven't received salaries for two months. Despite promises of a 10% hike, their basic pay remains unpaid, leaving them struggling to celebrate the festival.
Web Summary : महाराष्ट्र में एनएचएम अनुबंध कर्मचारी दिवाली के नजदीक आने पर कठिनाइयों का सामना कर रहे हैं, क्योंकि उन्हें दो महीने से वेतन नहीं मिला है। 10% की वृद्धि के वादे के बावजूद, उनका मूल वेतन बकाया है, जिससे उन्हें त्योहार मनाने में मुश्किल हो रही है।