पुणे : महाविद्यालयांतून राजकीय आणि सामाजिक नेतृत्व उभे राहावे यासाठी महाराष्ट्रातील महाविद्यालयांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षापासून पुन्हा विद्यार्थ्यांच्या निवडणुका घेतल्या जातील. या निवडणुका शांततामय वातावरणात व्हाव्यात यासाठी निवडणूक प्रक्रियेत आवश्यक बदलही केले जातील,असे राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी येथे सांगितले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भाषा प्रयोगशाळेचे उद्घाटन तसेच प्रशासकीय व आयडीएस इमारतीचे भूमिपूजन तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.वासुदेव गाडे, कुलसचिव डॉ.नरेंद्र कडू, विद्यापीठाच्या महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ.व्ही.बी.गायकवाड आदी उपस्थित होते. यानंतर तावडे यांनी विद्यापीठातील विद्यार्थी, विविध विद्यार्थी संघटना, प्राचार्य, प्राध्यापक संघटना, शाळा बाह्यमुलांसाठी काम करणाऱ्या संस्था यांच्याशी शैक्षणिक विषयावर चर्चा केली.निवडणुकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी होते, असेही काहींचे मत आहे. मात्र, या निवडणुका सोशल मिडिया किंवा इतर माध्यमांच्या मदतीने शांततेत कशा घेता येतील, त्यासाठी आचारसंहिता करता येईल का, खेळीमेळीच्या वातावरणात कशा घेता येतील, याद्रुष्टीने प्रयत्न होतील असे तावडे म्हणाले.
पुढील वर्षी महाविद्यालयीन निवडणुका
By admin | Updated: November 21, 2014 01:56 IST