कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या किरणोत्सवाच्या रविवारी दुसऱ्या दिवशीही मावळतीची किरणे श्री अंबाबाईच्या चरणांपर्यंतच पोहोचली अन् भाविकांचा भ्रमनिरास झाला़ मावळतीच्या सूर्यकिरणांनी सायंकाळी ५़३६ वाजता गरुडमंडपात प्रवेश केला़ यावेळी या किरणांची प्रकाशतीव्रता २२०० ल्युमिन्स इतकी होती़ सूर्यकिरणांनी सायंकाळी ६़१५ वाजता चरणस्पर्श केला़ सूर्यकिरणे जसजशी पुढे येत होती, तशी भाविकांची उत्सुकता शिगेला पोहोचत होती़ ५.५९ मिनिटांनी किरणे पितळी उंबरठ्यापाशी आली अन् भाविकांनी श्री अंबाबाईच्या नावाचा जयघोष करण्यास सुरुवात केली़ सूर्यकिरणांनी ६.०६ मिनिटांनी गर्भगृहात प्रवेश केल्यानंतर किरणे काहीशी रेंगाळली़ त्यानंतर गर्भगृह ते गर्भकुढीदरम्यानच्या तीन पायऱ्या पार करीत ६़१५ वाजता श्री अंबाबाईच्या चरणांना किरणांचा स्पर्श झाला़; पण तिथून ही किरणे पुढे सरकली नाहीत़ शनिवारच्या तुलनेत रविवारी सूर्यकिरणे प्रखर असल्यामुळे किरणोत्सव पूर्ण होईल, असा अंदाज होता; पण धुळीमुळे किरणोत्सवात अडथळा आला, असे मत प्राध्यापक डॉ़ कारंजकर यांनी व्यक्त केले़
दुसऱ्या दिवशीही पुन्हा चरणस्पर्शच़़.!
By admin | Updated: February 2, 2015 04:39 IST