पुणे : महापालिकेच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक १५ मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजता घेण्याचे निर्देश विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी सौरभ राव या निवडणुकीचे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळविलेल्या भाजपाकडून कोणाला महापौरपदाची उमेदवारी दिली जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी महापालिकेचे नगरसचिव सुनील पारखी यांना ई-मेल पाठवून महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक १५ मार्च रोजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महापौर, उपमहापौरपदासाठी अर्ज भरणे, अर्ज माघारी यांचा कार्यक्रम नगरसचिव कार्यालयाकडून शुक्रवारी जाहीर केला जाणार आहे. पुण्याचे महापौरपद सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी राखीव आहे. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये ९८ जागा मिळवून भाजपाने मोठे यश प्राप्त केले आहे. भाजपाच्या अनेक ज्येष्ठ महिला नगरसेविका महापौरपदाच्या शर्यतीमध्ये आहेत. माजी गटनेत्या मुक्ता टिळक, रंजना टिळेकर, वर्षा तापकीर, रेश्मा भोसले, माधुरी सहस्रबुद्धे, मानसी देशपांडे, मंजुश्री नागपुरे, नीलिमा खाडे आदी महिला नगरसेविका महापौरपदाच्या शर्यतीमध्ये आहेत. महापालिकेच्या सभागृहामध्ये ८४ महिला उमेदवारांनी विजयश्री संपादन करून प्रवेश केला आहे. त्यामध्ये भाजपाकडून ४८ नगरसेविका निवडून आल्या आहेत. त्यामध्ये चौथ्यांदा, तिसऱ्यांदा व दुसऱ्यांदा सभागृहात निवडून आलेल्या महिला नगरसेविकांमध्ये जोरदार चुरस आहे. त्याचबरोबर पहिल्यांदाच सभागृहात प्रवेश केलेल्या काही नगरसेविकांनीही महापौरपदाचा मान मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पुण्यनगरीच्या प्रथम नागरिक होण्याचा मान १९९६ पासून आतापर्यंत ८ जणींना मिळाला आहे, आता नवव्यांदा भाजपाच्या महिला महापौर सभागृहाची सूत्रे हाती घेणार आहेत. महापालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच भाजपाचा महापौर शहराला मिळणार आहे. महापौरपद महिलेकडे जाणार असल्याने उपमहापौरपदी पुरुष नगरसेवकाला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. उपमहापौरपदासाठीही अनेकांकडून प्रयत्न केले जात आहेत. या निवडीनंतर सभागृह नेते व स्थायी समिती अध्यक्ष यांची निवड होणार आहे. या पदांसाठी भाजपाकडील इच्छुक नगरसेवकांची संख्या मोठी आहे. (प्रतिनिधी)>निवडीची केवळ औपचारिकताराज्यात दहा महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. पुणे महापालिकेत भाजपाचे बहुमतापेक्षाही १६ अधिक नगरसेवक निवडून आल्याने महापौर निवडणुकीची प्रक्रिया ही केवळ औपचारिकता असणार आहे. भाजपाकडून महापौरपदाची उमेदवारी जाहीर केल्यानंतरच पुण्याचे नवीन महापौर कोण असणार, याचा सस्पेन्स संपणार आहे.>भाजपाच्या निवडी ४ दिवसांनंतरभाजपाकडून महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष आदी पदांवर कोणाची वर्णी लावली जाणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. येत्या ३ ते ४ दिवसांमध्ये प्रदेशाकडून प्रभारी येतील, त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या पदांसाठी भाजपाच्या उमेदवारांची निवड केली जाईल, अशी माहिती भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी दिली.
पुण्याला १५ मार्च रोजी मिळणार नवीन महापौर
By admin | Updated: March 3, 2017 00:48 IST