पुणे : सातत्याने वाढत असलेल्या प्रवाशांमुळे लोहगाव विमानतळ गर्दीचा हवाईतळ ठरत आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने प्रवाशांच्या सोयीसाठी विमानतळावर प्रसाधनगृह उभारणीपासून ते टर्मिनलच्या विस्तारीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून, त्यामुळे विमानतळावरील वावर अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे देशभरातील ९ विमानतळांवर विविध विकासकामे करण्यात येणार असून, त्यात पुण्याचाही समावेश करण्यात आला आहे. हवाई वाहतूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दोन वर्षांपूर्वी ४१.९० लाख प्रवाशांनी या विमानतळाच्या माध्यमातून प्रवास केला होता. त्यात या आर्थिक वर्षांत ६७ लाखांपर्यंत वाढीचा अंदाज आहे. त्यामुळे विमानतळावर नवीन सुविधा उभारण्यात येत आहे. त्यातील विमानाच्या वेळा दर्शविणारे ३० नवीन डिस्प्ले, प्रकाश व्यवस्था, प्रसाधनगृहांची कामे पूर्ण झाली आहेत. विमानतळ विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार अनिल शिरोळे यांनी ही माहिती दिली. (प्रतिनिधी)>निविदा प्रक्रिया पूर्णविमानतळ प्राधिकरणाच्या पथकाने लोहगाव विमानतळाची पाहणी केली होती. त्यात प्रवाशांची सुरक्षाविषयक तपासणी करण्यात खूप वेळ जात असल्याचे लक्षात आले होते. याशिवाय प्रवाशांच्या तुलनेत विमान उड्डाणांची माहिती देणारे फलक अपुरे असल्याची व खाद्यपदार्थांचे केंद्रही अपुरे पडत असल्याचे निरीक्षण या पथकाने नोंदविले होते. तसेच अधिक स्वच्छतागृहांची गरजही पथकाने नमूद केली होती. त्यानुसार टर्मिनलजवळील गर्दी टाळण्यासाठी त्याचा एक हजार स्क्वेअर मीटरने विस्तार करण्यात येणार असून, सुरक्षा तपासणी परिसराची व्याप्तीदेखील २०० स्क्वेअर मीटरने वाढविली जाणार आहे. याव्यतिरिक्त ८ नवीन चेक इन काऊंटरची निर्मिती, २ सुरक्षा तपासणी केंद्राच्या एकत्रीकरणाचे काम करण्यात येणार आहे. नवीन टर्मिनल आणि प्रसाधनगृहांची देखरेख करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दिशा प्रकल्पांतर्गत ही सर्व विकासकामे मार्च २०१८ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. >लोहगाव विमानतळावरील प्रवासी वर्दळ वर्षसंख्या २०१४-१५४१,९०,५०९२०१५-१६५४,१७,१६७२०१६-१७६६,९९,३३८ (अपेक्षित)
विमानतळाला मिळणार नवी दिशा
By admin | Updated: March 3, 2017 00:50 IST