नवी दिल्ली : उन्हाच्या झळांसोबतच निवडणुकीच्या हवेने देशाची राजधानी असलेल्या दिल्लीचे वातावरण तापले असताना जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) गुरुवारी जारी केलेल्या अहवालात जगात सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून दिल्लीवर शिक्कामोर्तब केले आहे. हवेतील घन आणि द्रव धुलिकणांच्या घटकांचे प्रमाण (पार्टिक्युलेट मॅटर) मोजण्याचे परिमाण पीएम २.५ असून २.५ मायक्रॉनपेक्षाही लहान आकाराचे घटक हवा प्रदूषित करतात आणि ते आरोग्यासाठी धोकादायक मानले जाते. हवेची गुणवत्ता पाहता दिल्लीत पीएम २.५ चे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आढळून आल्याचे डब्ल्यूएचओने अहवालात स्पष्ट केले आहे. ९१ देशांतील १६०० शहर आणि परिसरातील हवेतील प्रदूषणाचा (अॅम्बियन्ट एअर पोल्युशन) डाटा तयार करण्यात आला. दिल्लीत पीएम २.५ ची घनता सर्वाधिक आढळून आली. हवेतील धुळीचे अतिसूक्ष्म कण श्वसनाचे आणि अन्य आजार उद्भवण्यास कारणीभूत ठरतात असे या संघटनेने म्हटले आहे. दिल्लीत हवेत पीएम २.५ परिमाणानुसार १५३ मायक्रोग्राम घनता तर पीएम १० परिमाणानुसार २८६ पेक्षा जास्त मायक्रोग्राम घनता आढळून आली. मुभा असलेल्या प्रमाणापेक्षा ती कितीतरी पटीने जास्त आहे. तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता हा अहवाल भारतातील आरोग्यविषयक चिंतेला दुजोरा देणारा आहे. वायूप्रदूषणाने होणारे आजार आणि मृत्यूमध्ये भारताचा क्रमांक पाचवा लागतो. हवेतील घातक घटक पीएम २.५ पेक्षा सूक्ष्म घटक थेट आपल्या फुप्फुसात जात असून हृदयरोग किंवा फुप्फुसाच्या कॅन्सरसारखे जीवघेणे आजार संभवतात, असे विज्ञान आणि पर्यावरण केंद्राच्या(सीएसई)अनुमिता रायचौधरी या अहवालावर प्रतिक्रिया देताना म्हणाल्या. वायुप्रदूषणाचे प्रमाण वाढतच असून अनेक शहरांमधील आधीच्या वर्षांचा डाटा तुलना करण्यास पुरेसा आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. अनेक शहरांच्या आकाशात घाणेरडी हवा निर्माण होत असून ती डोळ्याने दिसत नाही, असे डब्ल्यूएचओचे सहायक महासंचालक(कुटुंब, बाल आणि महिला आरोग्य) डॉ. फ्लेव्हिया बुस्ट्रेओ यांनी म्हटले. ३७ लाख लोकांचा मृत्यू... २०१२ मध्ये घराबाहेरील वायुप्रदूषणामुळे ६० वर्षांखालील ३७ लाख लोकांचा मृत्यू झाल्याचे डब्ल्यूएचओने गेल्याच महिन्यात नमूद केले होते. घरातील व बाहेरील वायुप्रदूषणाचा संयुक्त परिणाम जगभरात दिसून येत असून त्यामुळे आरोग्यविषयक सर्वाधिक जोखीम निर्माण होते. कोळशावर चालणारे ऊर्जा प्रकल्प किंवा खनिजातून वापरल्या जाणार्या इंधनासारख्या घटकांमुळे वायुप्रदूषणात भर पडते. खासगी वाहतुकीच्या साधनांवर वाढलेली निर्भरता, घरांमध्ये अपुरी ऊर्जासाधने, स्वयंपाक आणि तापविण्यासाठी जैव इंधनांचा वापर या सारखे घटकही कारणीभूत ठरतात. (लोकमत न्यूज नेटवर्क)
एकेकाळी चीनची राजधानी बीजिंग सर्वात प्रदूषित शहर मानले जात होते. दिल्लीने या शहराला मागे टाकले आहे. या शहरातील धुलिकणांची घनता एम २.५ नुसार ५६ मायक्रोग्राम तर पीएम १० परिमाणानुसार १२१ मायक्रोग्राम आहे.
हवेची गुणवत्ता वार्षिक सरासरी घनतेनुसार मोजली जात असून ( पीएम १० आणि पीएम २.५ नुसार धुलिकण १० किंवा २.५ मायक्रॉन्सपेक्षा छोटे असतात.) या डाटाबेसमध्ये २००८ ते २०१३ हा कालावधी समाविष्ट असून २०११ आणि १२ मधील मूल्यांकनाचा जास्त आधार आहे.