वाटाघाटी अर्धवट

By admin | Published: November 29, 2014 02:21 AM2014-11-29T02:21:09+5:302014-11-29T02:21:09+5:30

शिवसेनेला चार कॅबिनेट तर सहा राज्यमंत्रिपदे देण्याची तयारी भाजपाने दर्शविली असल्याचे समजते.

Negotiation partially | वाटाघाटी अर्धवट

वाटाघाटी अर्धवट

Next
भाजपाकडून 10 मंत्रिपदांची ऑफर : उपमुख्यमंत्री पदावर शिवसेना ठाम
मुंबई : शिवसेनेला चार कॅबिनेट तर सहा राज्यमंत्रिपदे देण्याची तयारी भाजपाने दर्शविली असल्याचे समजते. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा प्रस्ताव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे ठेवला असल्याचे कळते. सेना उपमुख्यमंत्रिपदावर ठाम असून, याबाबतच्या वाटाघाटी अपूर्ण राहिल्याने चर्चा आणखी काही दिवस सुरू राहतील, असे संकेत आहेत.
धर्मेद्र प्रधान व चंद्रकांत पाटील हे शुक्रवारी दुपारी भाजपाच्या प्रदेश कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांची अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे, भाजपाचे संघटनमंत्री सुरेश भुसारी यांच्यासोबत दीड तास बैठक झाली.  मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार हेही बैठकीत सहभागी झाले. त्यानंतर प्रधान-पाटील हे सव्वापाच वाजता मातोश्रीवर जाण्यास निघाले. 
तत्पूर्वी माध्यमांशी बोलताना प्रधान म्हणाले, शिवसेना हा आमचा जुना मित्रपक्ष आहे. त्यांच्यासोबत आमचे गेली 25 वर्षे संबंध राहिले आहेत. शिवसेना केंद्रातील रालोआ सरकारमध्ये सहभागी आहे. त्यामुळे शिवसेनेने राज्यातील सरकारमध्ये सहभागी व्हावे, ही भाजपाची इच्छा आहे. त्याच दृष्टीने चर्चा करण्याकरिता आम्ही मातोश्रीवर जात असून ही चर्चा सकारात्मक होईल, असा आम्हाला विश्वास आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुढील आठवडय़ाच्या प्रारंभी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा आहे. आणखी 12 मंत्री भाजपा घेणार आहे. यामुळे भाजपाच्या मंत्र्यांची संख्या 22 होईल. शिवसेनेला चार कॅबिनेट व सहा राज्यमंत्रिपदे दिली तर मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या 32 होईल. शिवसेनेची उपमुख्यमंत्रिपदाची मागणी मान्य करण्यास भाजपा अजून तयार नाही.
सेनेतील ज्येष्ठ नेते दिवाकर रावते, रामदास कदम, डॉ. नीलम गो:हे, डॉ. दीपक सावंत हे मंत्रिपदासाठी उत्सुक आहेत. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले नेते सुभाष देसाई यांनाही मंत्रिमंडळात समाविष्ट करायचे, तर त्यांनाही विधान परिषदेवर निवडून आणावे लागेल. त्यामुळे विधान परिषदेतून किती मंत्री करायचे, असा पेच उद्धव ठाकरे यांच्यापुढे निर्माण झाला आहे. विधानसभेतील एकनाथ शिंदे, विजय शिवथरे, गुलाबराव पाटील अशी काही नावे मंत्रिपदाकरिता चर्चेत आहेत. मात्र विधान परिषदेला झुकते माप दिले तर विधानसभेतील सदस्य नाराज होतील. शिवाय यानंतर केंद्रातील सरकारमध्ये अनिल देसाई यांचा समावेश केला गेला तर चंद्रकांत खैरे, शिवाजीराव अढळराव-पाटील व आनंदराव अडसूळ यांची नाराजी ओढवून घेण्याची भीती आहे.
शहांना दातदुखी !
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा  शिवसेनेवर दात असल्याने गेल्या 25 वर्षाची युती तुटली, अशी चर्चा असतानाच शहा यांचा शनिवारचा मुंबई दौरा दातदुखीमुळे रद्द झाल्याचे समजते. इंग्रजी दैनिकाच्या परिसंवादात शहा भाग घेणार होते. मात्र शिवसेनेसोबतच्या युतीबाबत प्रश्नांची सरबत्ती टाळण्याकरिता शहा यांनी दौरा टाळल्याची चर्चा आहे. 
 
पायरी चढावी लागली
कुठल्याही परिस्थितीत यापुढे मातोश्रीची पायरी चढणार नाही, कुणाच्या नाकदु:या काढणार नाही, असे नाकाने कांदे सोलणा:या महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना दिल्लीतून केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान तर सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांना सरकार स्थिर करण्याकरिता मातोश्रीवर धाडावे लागले. 

 

Web Title: Negotiation partially

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.