ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - वैदयकीय सामाईक प्रवेशासाठी NEET किंवा नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट - एनईईटी - ‘नीट’ ही परीक्षा 1 मे रोजीच होणार असा निकाल पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. काल, गुरुवारी सदर निकाल दिल्यानंतर, महाराष्ट्रासह काही राज्यांनी फेरविचार याचिका दाखल केली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय कायम ठेवला आहे.
‘नीट’ परीक्षा फक्त आंग्लवैद्यकाचा ‘एमबीबीएस’ पदवी अभ्यासक्रम व दंतवैद्यकाचा ‘बीडीएस’ पदवी अभ्यासक्रम यांच्याच प्रवेशासाठी असेल. याच वैद्यकशाखांचे पदव्युत्तर प्रवेश तसेच आयुर्वेद (बीएसएमएस), होमिओपथी (बीएचएमएस) आणि युनानी (बीयूएमएस) या अन्य वैद्यकशास्त्रांचे पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश या परीक्षेने होणार नाहीत.
महाराष्ट्र राज्यातल्या पावणे दोन लाख मुलांच्यासाठी हा गंभीर प्रश्न असल्याचे सांगण्यात येत आहे. NEETचा अभ्यास करायला फार थोडा वेळ या विद्यार्थ्यांकडे उरला आहे. केंद्राने विविध राज्यांची भूमिका मांडत अनेक पर्याय दिले. महाराष्ट्र, कर्नाटक व तमिलनाडु या राज्यांवर या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.