NCP SP MP Nilesh Lanke News: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वाढदिवस १२ डिसेंबर रोजी झाला. या निमित्ताने देशभरातील राजकीय नेते आणि अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आयोजित केलेले स्नेहभोजन चर्चेचा विषय ठरले. या स्नेहभोजनाला अजित पवार यांची उपस्थिती लक्ष वेधून घेत असतानाच, काँग्रेस नेते राहुल गांधी व उद्योजक गौतम अदानी हे या वेळी समोरासमोर आल्याचे म्हटले जात आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदाराने शरद पवार यांना भारतरत्न पुरस्कार देण्याच्या मागणीला समर्थन दिले आहे.
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रफुल पटले आणि अजित पवार दिल्लीत होते. यानिमित्ताने दोन्ही राष्ट्रवादी गट पुन्हा एकत्र येण्याबाबत चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. याबाबत खासदार निलेश लंके यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. पवार कुटुंब म्हणून एकत्रच आहेत. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या जातात, असे लंके यांनी म्हटले आहे.
शरद पवारांना भारतरत्न पुरस्कार द्यावा
पत्रकारांशी बोलत असताना खासदार निलेश लंके यांना शरद पवार यांना भारतरत्न देण्याबाबच्या मागणीबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर बोलताना निलेश लंके म्हणाले की, ही मागणी अतिशय योग्य आहे. शरद पवार असे एकमेव कृषी मंत्री आहेत की, ज्यांच्या काळात ७२ हजार कोटींची विक्रमी शेतकऱ्यांची कर्ज माफी झाली. देशाच्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांमध्ये शरद पवारांचा मोठा वाटा राहिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अशी भावना आहे की, शरद पवारांना भारतरत्न पुरस्काराने गौरविले गेले पाहिजे. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनातही आम्ही याबद्दलची मागणी करू, असे खासदार निलेश लंके यांनी सांगितले.
दरम्यान, शरद पवार यांनी दिल्लीत आयोजित केलेल्या स्नेहभोजन कार्यक्रमाला अजित पवार आणि प्रफुल पटेल हेही उपस्थित होते. पवार कुटुंबीयांचा हा सोहळा एकत्रितपणे उत्साहात झाला असला तरी, राजकीयदृष्ट्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गट एकत्र येण्याचा मुद्दा मात्र अजून गुलदस्त्यात राहिला आहे. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची सातत्याने चर्चा होत असली तरी हे मनोमीलन एवढ्यात होण्याची शक्यता नसल्याचे म्हटले जात आहे.