NCP SP Group MP Supriya Sule News: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि बीड जिल्ह्यातील दहशतीवरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गेले काही दिवस सातत्याने जोरदार हल्लाबोल करणारे भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेटल्याचे समोर आल्याने वादळ निर्माण झाले. सुरेश धस यांच्या आरोपांमुळे धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदावर गदा येणार की काय, अशी परिस्थिती असताना व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधत या 'गळाभेटी'ची बातमी समोर आली. दुसरीकडे अजित पवार गटाने मुंडेंना पक्षाच्या कोअर ग्रुपमध्ये स्थान दिल्याचे जाहीर केले. राजकीय मंचावरील हे 'तुझ्या गळा, माझ्या गळा' प्रेमाचे नाट्य पाहून सर्वसामान्य नागरिकांनी तोंडात बोटे घातली. यावरून आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या मध्यस्थीने ही भेट झाल्याचे सूतोवाच केले. तसेच चार-साडेचार तास आम्ही तिघे एकत्र होतो, असा गौप्यस्फोट केला. आम्ही काही वेळ एकत्र होतो. दोघांमध्ये मनभेद नाही; थोडे मतभेद आहेत, ते दूर होतील. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, माझ्याकडे दोघेही भेटले. मुंडे यांनी माझ्यासोबत काम केले आहे. आम्ही तिघेही परिवार म्हणून बसलो होतो, मी कोणालाही तडजोड करायला सांगितले नाही, असे बावनकुळेंनी सांगितले. यावरून आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुरेश धस यांच्याबद्दल विश्वास व्यक्त केला.
सुरेश धस तडजोड करणार नाही
१८ तारखेला बीडला जाणार आहे. देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना आम्ही सोबत असल्याचा विश्वास देणार आहे. सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीच्या बातम्या वाचून धक्काच बसला. भ्रष्टाचार, वसुली यासारख्या अनेक गोष्टी घडल्या, पण राज्य सरकारने ठोस कारवाई केली नाही. राज्यातील परिस्थिती अस्वस्थ करणारी आहे. सुरेश धस हे तडजोड करणार नाहीत, असा माझा विश्वास आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
दरम्यान, राहुल गांधी यांच्यासोबत माझी भेट झाली आहे. त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आहे. एकदा महापालिका निवडणुकीची नक्की तारीख ठरली की, त्यावर निर्णय होईल. भाजपा एकटे लढणार असल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. शत प्रतिशत अशी टॅगलाईन अमित शाह यांनी यापूर्वी दिली आहे, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला.