मुंबई : तक्रार काँग्रेस श्रेष्ठींकडे करणार आहात, तर माध्यमांकडे जाहीररीत्या बोलण्याची गरज नाही, असे सुनावतानाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा दबाव झुगारून दिला. दिवसभरात उभयपक्षी झालेल्या कलगीतुऱ्यानंतर रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत स्वबळावर लढण्याची भाषा करण्यात आली होती. लोकहिताचे अनेक निर्णय अडले असल्याबद्दल नाराजी व्यक्त करतानाच मुख्यमंत्र्यांची कैफियत काँग्रेस श्रेष्ठींकडे करण्याचे ठरले होते. तसेच विधानसभा निवडणुकीत आघाडीमध्ये राष्ट्रवादीला जागा वाढवून मिळाल्या पाहिजेत, अशी भूमिका घेतली होती. त्याला मुख्यमंत्री चव्हाण यांनी जाहीर प्रत्युत्तर दिले. लोकहिताचे निर्णय मी घेतच आहे आणि लोक मला निश्चितच पाठिंबा देतील, असा विश्वास व्यक्त करीत कामे होत नसल्याची ओरड करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सुनावले. विधानसभेसाठीचे जागावाटपाचे धोरण चर्चा करून ठरवू. हा विषय पत्रकारांसमोर मांडून सोडवता येणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, उपमुख्यमंत्री पवार कार्यक्रमाला गैरहजर राहिल्याने विविध चर्चा रंगल्या. राष्ट्रवादीचा दबाव झुगारला! खेरवाडी येथील उड्डाणपुलाचे (फ्लायओव्हर) व पांजरपोळ-घाटकोपर जोडरस्त्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या वेळी पत्रकारांनी राष्टÑवादीच्या मागणीबाबत विचारणा केली असता ते व्यासपीठावर उपस्थित असलेल्या राष्टÑवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडे पाहत हसत म्हणाले, ‘ज्या वेळी चर्चा करायला बोलावले, त्या वेळी हे पक्षाच्या कामात होते. त्यामुळे बैठक झाली नाही. आता मीडियासमोर चर्चा करून जागावाटप होणार नाही. त्यासाठी एकत्रित बसून योग्य वेळी चर्चा केली जाईल़ काँग्रेसचे राज्यसभा सदस्य हुसेन दलवाई यांनीही आज राष्ट्रवादीवर हल्ला चढवला. स्वबळावर लढायला गेले तर त्यांचे नुकसान जास्त होईल. निवडणुकीत काँग्रेसची मते त्यांना मिळतात, त्यांची तेवढी मते आम्हाला पडत नाहीत. एकत्रित लढवायचे असेल तर दबावाचे राजकारण करून वातावरण बिघडविणे योग्य नाही, असे त्यांनी सुनावले. दोन्ही प्रकल्पांचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते. तशा जाहिरातीही प्रसिद्ध करण्यात आल्या. मात्र प्रत्यक्षात उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला आलेच नाहीत. (विशेष प्रतिनिधी)
राष्ट्रवादीचा दबाव झुगारला!
By admin | Updated: June 17, 2014 09:33 IST