भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली आणि राज्यात 'देवेंद्र 3.0'ला सुरुवात झाली. मुंबईतील आझाद मैदानावर हा भव्य-दिव्य समारंभ पार पडला. या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, याशिवाय, एनडीएशासित राज्यांचे मुख्यमंत्री यांच्यासह साधू-संत-महंत, उद्योगपती, बॉलीवूडमधील मंडळी आणि 40 हजार नागरिक उपस्थित होते. या शपथविधी समारंभानंतर, राज्यातील अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. यातच नवनीत राणा यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
शपथविधी समारंभानंतर मुंबईत एका मराठी वृत्तवाहीणीसोबत बोलताना राणा म्हणाल्या, "हे स्वप्न आम्ही गेल्या पाच वर्षांपासून बघत होतो. मात्र, 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी दगा देऊन धोका देऊन जी शपथ घेतली होती, त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला धोका दिला होता. आज महाराष्ट्रातील जनतेने देवेंद्र फडणवीस यांना बहुमत देऊन त्या धोक्याला उत्तर दिले आहे. जनता अशा पद्धतीने गद्दारीला उत्तर देऊ शकते आणि ते आज दिले आहे."
"आज सत्याचा विजय आहे. 2019 मध्ये या महाराष्ट्राला ज्यांनी धोका दिला आणि धोकादेऊन ज्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, आज धोकेबाज कोण? हे सिद्ध होत आहे. महाराष्ट्रातील जनता बाजूला सारते आणि जे सत्याची लढाई लढतात आज त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यामुळे मला असे वाटते की, धोकेबाजांना या महाराष्ट्राच्या जनेतेने धडा शिकवला आहे," असेही राणा म्हणाल्या.
दरम्यान, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनीही आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.