मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेचे सभापतीपद घ्यावे आणि काँग्रेसला उपसभापतीपद द्यावे, असा प्रस्ताव आम्ही दिला होता पण त्यांना भाजपासोबतच जायचे असल्याने त्यांनी हा प्रस्ताव अमान्य केला. काँग्रेसच्या पाठीत राष्ट्रवादीने खंजीर खुपसला असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. एका निवेदनात चव्हाण यांनी म्हटले आहे की, राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीचे निकाल येताच भाजपाला पाठिंबा जाहीर केला होता. सोमवारी त्यांनी पुन्हा दगाबाजी केली. भविष्यात त्यांचे राजकारण कोणत्या दिशेने असेल आणि त्यांना काय साध्य करायचे आहे ते या निमित्ताने जनतेसमोर उघड झाले आहे. शिवाजीराव देशमुख यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव म्हणजे केवळ खुर्चीच्या हव्यासापोटी नीतीशून्य व लोकशाहीतील संकेतांचे वस्रहरण करणारे राजकारण असल्याचे चव्हाण म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
राष्ट्रवादीने काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला
By admin | Updated: March 17, 2015 01:27 IST