ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २० - काँग्रेस नेतृत्व आणि मुख्यमंत्र्यांवर नाराज असलेले उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. सोमवारी दुपारी राणे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सोपवला. दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेऊन राणे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीची माहिती देणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या निकालापासून नारायण राणे हे काँग्रेस नेतृत्वावर नाराज आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर राणेंनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. विधानसभेपूर्वी राज्यात काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल करावे अशी मागणी त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे केली होती. मात्र पक्षनेतृत्वाने विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर विश्वास कायम ठेवत राणेंची मागणी धुडकावून लावली. गेल्या नऊ वर्षांपासून काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचे दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने राणे नाराज आहेत अशी चर्चा राजकीय वर्तूळात रंगली आहे. सोमवारी दुपारी राणेंनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या 'वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर राणे काँग्रेसनमध्येच राहतात की नवीन पर्याय निवडतात हे दुपारी तीन वाजता होणा-या पत्रकार परिषदेत स्पष्ट होणार आहे.