ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - काँग्रेसचे आमदार नारायण राणे यांच्यावर शुक्रवारी अॅन्जिओप्लास्टी करण्यात आली. आता राणे यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना उद्या डिस्चार्ज मिळू शकतो अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.
गुरुवारी रात्री उशिरा राणे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी राणे यांच्या काही तपासण्या करण्यात आल्या. त्यांची अॅन्जिओग्राफी करण्यात आली. अॅन्जिओग्राफी केल्यानंतर हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मॅथ्यू यांनी अॅन्जिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिला. तत्काळ राणे यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी करुन एक स्टेण्ट् बसवण्यात आला. शुक्रवारी सकाळी अॅन्जिओप्लास्टी झाल्यावर राणे यांना डॉ. जलील परकार यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
अॅन्जिओप्लास्टीनंतर राणे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. राणे यांनी उपचारांना दिलेल्या प्रतिसादामुळे त्यांना रविवारी डिस्चार्ज देण्यात येऊ शकतो. पण, काही तपासण्या झाल्यावर याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)