गेल्या काही दिवसांपासून नातेसंबंधांमधील वाद, अनैतिक संबंध यामधून घडणाऱ्या गुन्ह्याच्या घटनांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. दरम्यान, नांदेडमध्ये आज घडलेल्या अशाच एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे. येथे लॉजवर गेलेल्या बहिणीचा पाठलाग करत तिचा भाऊ तिथे पोहोचला. त्यानंतर तिथे वाद झाला. भावाला आलेलं पाहून बहिणीने पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळ काढला. तर संतापलेल्या भावावर चाकूने वार केले. या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नांदेडमधील अर्धापूर तालुक्यातील एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तीन तरुणी ह्या त्यांच्या मित्रांसोबत लॉजवर आल्या होत्या. यामधील एका तरुणीच्या भावाला त्याची बहीण लॉजवर गेल्याची कुणकूण लागली आणि तो तिथे पोहोचला. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्रही होते. त्याने बहिणीला तिच्या मित्रासोबत रंगेहात पकडताच तो मित्र आणि सदर मुलीच्या भावामध्ये कडाक्याचं भांडण झालं. दरम्यान, भावाचा संताप पाहून भेदललेल्या बहिणीने लॉजच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळ काढला. मात्र पळताना तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली.
तर या तरुणाने बहिणीच्या मित्राला पकडून बाहेर नेले. तसेच भोकर फाट्याजवळ आणून मारहाण करत त्याच्यावर चाकूने वार केले. .यात सदर तरुण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी आता पोलिसांत जिवे मारण्याचा प्रयत्न आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणातील पीडित तरुणींनी त्या लॉजवर ज्या तरुणांसोबत गेल्या होत्या, त्यांच्याच विरोधात तक्रार दिल्याने प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. कॉलेज सुटल्यावर तीन तरुणांनी आम्हाला बळजबरीने दुचाकीवर बसवून लॉजवर नेले होते, अशी तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आोपींविरोधात अत्याचार आणि अॅट्रॉसिटीची गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.