परभणी/यवतमाळ : नाफेडने तूरखरेदी बंद केल्यामुळे खरेदी केंद्रांवर लाखो क्विंटल तूर पडून असून केंद्राबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. शनिवारपासून नाफेडने तूर खरेदी बंद केली. त्यामुळे शेवटच्या दाण्यापर्यंत तुरीची खरेदी सुरूच राहील, अशी वल्गना करणारे राज्य सरकार सपशेल तोंडघशी पडले आहे. लाखो क्विंटल तुरीची अद्यापही खरेदी झालेली नाही. सरकारने नाफेडमार्फत ५०५० रुपयांनी तूर खरेदी केली; मात्र खरेदी केंद्रे बंद होताच व्यापाऱ्यांनी तुरीचा भाव पाडला असून केवळ ३००० ते ४००० प्रति क्विंटल दराने शेतकऱ्यांकडील तूर खरेदी केली जात आहे.लातूर, सोलापूर, अकोला, हिंगोली, परभणी, यवतमाळ या तूर उत्पादक जिल्ह्यांतील शेतकरी आर्थिक संकटात आहेत. सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने लग्नकार्य तसेच आगामी खरीप हंगामासाठी बी बियाणे, खते याची जुळवाजुळव कशी करावी, या आर्थिक विंवचनेत सापडला आहे. अकोला जिल्ह्यात २०८४ गाड्यांची रांग अजूनही खरेदी केंद्राबाहेर आहे. परभणी येथील नाफेडचे हमीभाव तूर खरेदी केंद्र बंद झाल्यानंतरही रविवारी या केंद्रासमोर शेकडो वाहनांच्या रांगा कायम होत्या. केंद्र सुरु होईल, या आशेने अजूनही शेतकरी खरेदी केंद्रासमोर ठाण मांडून आहेत. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने राज्यात तुरीचे उत्पादन वाढले. मात्र, परंतु, खुल्या बाजारपेठेमध्ये तुरीचा भाव गडगडला. कमी दराने तुरीची खरेदी व्यापाऱ्यांनी सुरु केली. त्यामुळे डिसेंबर महिन्यात शासनाने हमीभाव तूर खरेदी केंद्रे सुरु केली. खरेदी केंद्रासमोर सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांच्या रांगा होत्या. मात्र, कधी बारदाना, तर कधी साठवणुकीचे कारण पुढे करत या केंद्रांवरील खरेदी थांबवण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांकडील सगळी तूर खरेदी झालीच नाही.सव्वातीन लाख क्विंटलचे काय?यवतमाळ जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर चक्क पोलीस संरक्षणात तूर खरेदी करावी लागली. तरीही ४० हजार क्विंटल तूर खरेदी होऊ शकली नाही. सव्वा तीन लाख क्विंटलची टोकनव्दारे नोंदणी केली होती. त्या तुरीचे आता काय होणार, असा प्रश्न आहे.शेतकऱ्यांचा रुद्रावतारनाफेडकडून व्यापाऱ्यांचीच तूर खरेदी केली जात असल्याने यवतमाळ येथील शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला. संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समिती कार्यालयात तोडफोड केली. प्रचंड गोंधळ निर्माण झाल्याने व्यापाऱ्यांनी तुरीचे मोजमापच बंद केले. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांना रात्रभर बाजार समितीच्या आवारातच थांबावे लागले.
नाफेडची तूर खरेदी बंद, शेतकरी आले अडचणीत
By admin | Updated: April 24, 2017 04:05 IST