खालापूर : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मंगळवारी पहाटे पुण्याला जाणाऱ्या मारु ती अल्टोला भीषण अपघात झाला. या अपघातात दोन महिला ठार झाल्या. त्या पुण्यातील रहिवासी होत्या. अपघातग्रस्त वाहनांना आगी लागण्याच्या घटना एक्सप्रेस वेवर वाढत आहेत. त्यामुळे सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पुण्याला जाणारी अल्टो कार एम एच १२ - के वाय ११६९ ही पहाटे दीडच्या सुमारास रसायनी रीसगावाच्या हद्दीतील भातान बोगदा पार करून आली आणि चालकाचे नियंत्रण सुटून कार रस्त्याच्या बाजूला २० फुट खोल नाल्यात कोसळली. कारने पेट घेतल्याने सोनम महेंद्र लोहार (२८) आणि त्यांची तीन वर्षाची मुलगी उर्वी महेंद्र लोहार यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला, तर कारमध्ये असणारे अन्य चौघे जखमी झाले. त्यांना पनवेल येथील अष्टविनायक रु ग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात इतका भीषण होता कि आगीत कारचा कोळसा झाल्याची माहिती रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार शिंदे यांनी दिली. जखमींवर पनवेलमधील अष्टविनायक रुग्णालयात उपाचारसाठी दाखल करण्यात आले. (वार्ताहर)
एक्स्प्रेस वेवर भीषण कार अपघातात माय-लेकीचा मृत्यू
By admin | Updated: May 6, 2015 04:53 IST