पुणे : मुरूड दुर्घटनेत दगावलेल्या आबेदा इनामदार महाविद्यालयातील १४ विद्यार्थ्यांच्या पालकांकडून महाविद्यालयावर कारवाईची मागणी केली जात आहे; मात्र सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला, तरीही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाकडून हालचाली होत नसल्याने पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे; मात्र अखेर विद्यापीठ प्रशासनाला कारवाईचा मुहूर्त सापडला असून, येत्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.विद्यापीठाशी संलग्न आबेदा इनामदार महाविद्यालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नियमावलीचे पालन करून सहलीचे आयोजन करणे आवश्यक होते; मात्र महाविद्यालयाने या नियमावलीचे काटेकोर पालन केले नाही. त्यामुळेच ही दुर्घटना घडली, असा अरोप करून पीडित पालक व संघटनांनी महाविद्यालयावरील कारवाईसाठी आंदोलने केली. प्रथमत: महाविद्यालय प्रशासनाकडून दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली; मात्र त्यात विद्यार्थ्यांच्या चुकीमुळेच ही दुर्घटना घडल्याचे नमूद करण्यात आले. अधिवेधनातही याबाबत प्रश्न उपस्थित केला गेला. अखेर पालकांच्या दबावानंतर विद्यापीठाने या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली; परंतु समितीने अहवाल सादर करून सुमारे दोन महिने होत आले, तरीही संबंधितांवर कारवाई होत नसल्याने पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.यूजीसीच्या नियमावलीप्रमाणे सहलीस ५० पेक्षा जास्त विद्यार्थी जाणार असतील, तर बरोबर डॉक्टर असणे आवश्यक आहे. तसेच सहलीच्या स्थळाची पाहणी करणे गरजेचे होते. त्याचप्रमाणे समुद्राच्या पाण्याच्या भरती-ओहोटीचा विचार करून विद्यार्थ्यांना पाण्यात जाण्यास परवानगी देणे गरजेचे होते; परंतु आबेदा इनामदार महाविद्यालयाच्या शिक्षकांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे समितीने अहवालात नोंदविले असल्याचे सूत्रांनी सांगितले.