ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. १८ - लोणावळा येथील कुमार रिसॉर्टमध्ये सात वर्षीय चिमुरडीची हत्या केल्याची घटना समोर आली असून वैद्यकीय चाचणीत चिमुरडीची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचे उघड झाले आहे. या घटनेविरोधात लोणावळ्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आला असून संतप्त जमावाने कुमार रिसॉर्टवर दगडफेक केल्याने तणावपूर्ण वातावरण आहे.
रायगडमधील इंदापूर येथे राहणारे एक कुटुंब रविवारी लोणावळा येथील कुमार रिसॉर्टमध्ये एका विवाह सोहळ्यासाठी आले होते. लग्न समारंभ पार पडल्यानंतर त्यांची सात वर्षांची मुलगी आयशा ही बेपत्ता असल्याचे समोर आले. लग्न समारंभ संपल्यावर रात्री साडे आठपर्यंत आयशा तिच्या मैत्रिणीसोबत खेळत असल्याचे तिच्या आईने बघितले होते.
गायब झाल्याच्या दोन दिवसानंतर म्हणजेच मंगळवारी दुपारी आयशाचा मृतदेह कुमार रिसॉर्टच्या टॅरेसवर आढळला. तीक्ष्ण हत्याराने गळा चिरुन तिची हत्या केल्याचे स्पष्ट झाले होते. या घटनेविरोधात आज लोणावळामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. संतप्त जमावाने जुन्या मुंबई - पुणे महामार्गावर रास्ता रोको केला. तसेच कुमार रिसॉर्टवर दगडफेकही केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी किरकोळ लाठीमार केला.