ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 18 - पंढरपूरचे माजी नगरसेवक नामदेव सुरेश भोईटे (वय ३६) यांचा सोमवारी रात्री मिरज-पंढरपूर रस्त्यावरील खरशिंग फाट्याजवळ कोयत्याने वार करून खून करण्यात आला. भोईटे यांचा मित्र राजू भिंगे यानेच दोन साथीदारांकरवी
हा खून केल्याचा संशय असून, याप्रकरणी तिघांविरूध्द ग्रामीण पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नामदेव भोईटे, राजू भिंगे व नाना झाडबुके हे तिघेजण सोमवारी मिरजेत भारती रुग्णालयात उपचार घेणा-या भिंगे याच्या नातेवाईकांची विचारपूस करण्यासाठी भाड्याच्या मोटारीतून (क्र. एमएच-४५-ए ३५५४) आले होते.
सायंकाळी सात वाजता तिघेजण पंढरपूरला परत निघाले. ते खरशिंग फाट्यावर गेले असता, भिंगे याने लघुशंकेचा बहाणा करीत तेथे मोटार थांबविली. मोटार थांबताच त्यांच्या मागून मोटारीतूनच आलेल्या दोन हल्लेखोरांनी नामदेव
भोईटे यांना मोटारीतून बाहेर ओढून काढून त्यांच्या डोक्यावर कोयत्याने सपासप ३५ वार केले. कोयत्यांच्या वारामुळे भोईटे जागीच कोसळले. हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न करणारा मोटारचालक प्रसाद निर्मल यालाही हल्लेखोरांनी मारहाण केल्याने, तो जीव वाचविण्यासाठी पळून जाऊन लपून बसला. भोईटे याचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर हल्लेखोर खुनासाठी
वापरलेले दोन कोयते तेथेच टाकून मोटारीतून पसार झाले. दोन २५ ते ३० वयाच्या हल्लेखोरांपैकी एकाने टी-शर्ट व बर्मुडा, तर दुसºयाने टी-शर्ट व पॅन्ट परिधान केली होती. मोटारचालक प्रसाद निर्मल याने मोबाईलवरून पंढरपुरात गाडी मालकास या घटनेबाबत कळविल्याने, खुनाबाबत मिरज ग्रामीण पोलिसांना माहिती मिळाली.
पोलिस निरीक्षक राजू मोरे, उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्यासह पोलिस फौजफाटा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी भोईटे यांचा मृतदेह, लपून बसलेला चालक प्रसाद निर्मल, मोटार व खुनासाठी वापरलेले दोन नवीन कोयते ताब्यात घेतले. कोयत्यांच्या हल्ल्यात भोईटे यांच्या डोक्याची कवटी फुटून, उजव्या हाताची तीन बोटे तुटली होती. घटनास्थळावरून राजू भिंगे व नाना झाडबुके हे दोघेही गायब झाले होते.
नामदेव भोईटे यांच्या खूनप्रकरणी मोटारचालक प्रसाद निर्मल याने पोलिसात फिर्याद दिली असून राजू भिंगे व त्याच्या दोन साथीदारांविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पळून गेलेल्या नाना झाडबुके यास मंगळवारी सकाळी पंढरपूर येथून ताब्यात घेण्यात आले.