केंद्राने रोखला जेएनएनयूआरएमचा निधी : उत्तर सिवरेज झोन प्रकल्प नामंजूरनागपूर : केंद्रात भाजपचे सरकार आल्याने भाजप नेते आनंदी झाले. एलबीटीमुळे (स्थानिक संस्था कर) बेजार झालेल्या महापालिकेला केंद्राकडून मदतीची आस होती. सत्तारूढ नागपूर विकास आघाडीसह शहरवासीयांनाही ‘अच्छे दिन’ची अपेक्षा होती; मात्र झाले उलटच. महापालिकेचे ‘बुरे दिन’ सुरू झाले. केंद्र सरकारच्या नगर विकास विभागाने एक पत्र जारी करीत जेएनएनयूआरएम प्रकल्प बंद केले जात असल्याचे जाहीर केले आहे. जेएनएनयूआरएम ही योजना स्थगित करण्याचा निर्णय ५ जुलै रोजी घेण्यात आला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात याची तरतूददेखील करण्यात आलेली नाही. ज्या महापालिकांमध्ये प्रकल्प सुरू आहेत, त्यांना मार्च २०१२ पर्यंत प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. यानंतर उर्वरित कामांसाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करून द्यायचा आहे. एवढेच नव्हे तर केंद्राने ४९० कोटी रुपयांच्या उत्तर सिवरेज झोन प्रस्तावालादेखील नामंजूर केले आहे. त्याचप्रकारे नागपुर सुधार प्रन्यास(नासुप्र)तर्फे करण्यात येत असलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांचाही निधी रोखण्यात आला आहे. त्यामुळे २४ बाय ७ योजनेचे काम बंद पडू शकते. जेएनएनयूआरएमअंतर्गत नागपुरात १४८७.२५ कोटी रुपयांच्या १९ प्रकल्पांना मंजुरी मिळाली. निविदा रक्कम १६८१.४१ कोटींची होती. यापैकी केंद्र सरकारकडून ४६१.१६ कोटी तर राज्य सरकारतर्फे १८५.११ कोटी रुपये मिळाले. महापालिकेने ६३४.४९ कोटी रुपये खर्च केले. आजवर १२७२.६४ कोटी रुपयेच खर्च झाले आहेत. १९ पैकी ९ प्रकल्प पूर्ण झाले आहेत. १० प्रकल्पांचे काम ७० ते ८० टक्के झाले आहे. आता केंद्राने हात वर केल्यामुळे महापालिकेची झोप उडाली आहे. पाणीपुरवठा योजनांना फटका जेएनएनयूआरएम प्रकल्प बंद केल्यामुळे २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेला मोठा फटका बसेल. पेंच-४, शहरातील उड्डाण पूल, ई-गव्हर्नन्स आदी योजना जवळपास बंद होतील. रामझुल्यासाठी देखील या योजनेंतर्गत निधी मिळणार होता. आता सर्वच प्रकल्पांचे कोट्यवधी रुपये अडकतील. (प्रतिनिधी)
मनपाचे आले ‘बुरे दिन’
By admin | Updated: July 17, 2014 01:04 IST