ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - गेल्या महिनाभरापासून दडी मारुन बसलेल्या पावसाने मुंबईत दमदार हजेरी लावली असून सोमवारी रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य व पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
जूनमध्ये तीन दिवसांच्या दमदार बॅटिंगनंतर राज्यभरातून पाऊस गायब झाला होता. मात्र सोमवारपासून पावसाने राज्याच्या विविध भागांमध्ये हजेरी लावल्याने सर्वांनीच सुटकेचा श्वास घेतला. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. याचा फटका रेल्वे व रस्ते वाहतुकीला बसला आहे. मध्य रेल्वेववरील वाहतूक सुमारे १५ ते २० मिनीटे उशीराने सुरु आहे. कुर्ला - शीव दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने वाहतूक खोळंबली आहे. तर पश्चिम रेल्वेवर अंधेरी - बांद्रा स्थानकादरम्यान पाणी साचल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहेय पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेंना सुट्टी देण्यात आली आहे. बोईसर - डहाणूजवळ रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने डहाणूला जाणा-या लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर एक्सप्रेस गाड्यांची वाहतूक विलंबाने सुरु आहे.