महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज मुंबईतील राजभवनात एका विशेष समारंभात आपल्या पदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे, त्यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सीपी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल पद रिक्त होते, आणि आता ही जबाबदारी आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपवण्यात आली.
आचार्य देवव्रत यांचा जन्म १८ जानेवारी पंजाबमध्ये १९५९ रोजी झाला. त्यांनी कुरुक्षेत्रातील गुरुकुलमध्ये शिक्षण घेतले. त्यांनी वेदांचे आणि भारतीय तत्त्वज्ञानाचे सखोल ज्ञान संपादन केले. ते एक उत्तम शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी गुरुकुल कांगरी विद्यापीठाचे आचार्य म्हणून काम केले आहे. शिक्षण आणि समाजसुधारणेच्या क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे.
देवव्रत हे २०१५ ते २०१९ या काळात हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी नैसर्गिक शेती आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले. २०१९ मध्ये त्यांची गुजरातचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. गुजरातमध्येही त्यांनी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. सप्टेंबर २०२५ मध्ये, त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. त्यांनी ही शपथ संस्कृत भाषेतून घेऊन सर्वांचे लक्ष वेधले. आचार्य देवव्रत हे त्यांच्या साधेपणासाठी आणि सामाजिक कार्यासाठी ओळखले जातात.