मुंबई : बेकायदा किडनी प्रत्यारोपण करण्याचा आरोप असलेल्या युरॉलॉजिस्ट डॉ. मुकेश शहा यांनी आरोग्य सेवा संचालनालयाला पत्र लिहिले होते. प्रत्यारोपण करण्याची परवानगी देण्यात यावी असे पत्रात नमूद करण्यात आले होते. मात्र, आरोग्यसेवेने ही मागणी फेटाळली असून चौकशी होईपर्यंत परवानगी देता येणार नाही असे स्पष्ट केले आहे. पवईच्या हिरानंदानी रुग्णालयातील किडनी रॅकेट जुलैमध्ये उघडकीस आले. १५ जुलै रोजी या रुग्णालयात पती-पत्नी असल्याचा बनाव करून किडनी प्रत्यारोपण करण्यात येणार होते. पोलिसांकडे तक्रार केल्यामुळे हा प्रकार उघड झाला. त्यामुळे हिरानंदानी रुग्णालय आणि संबंधित डॉक्टरांचे प्रत्यारोपण करण्याचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. पण, डॉ. मुकेश हे हिरानंदानी रुग्णालयात व्हिजिटिंग डॉक्टर आहेत. या रुग्णालयाबरोबर ते अन्य १० ते १२ रुग्णालयांशी संलग्न आहेत. त्यांचा प्रत्यारोपणाचा परवाना रद्द केल्यामुळे त्यांच्या रुग्णांवर परिणाम होत आहे. त्यामुळे अन्य रुग्णालयांतील रुग्णांचा विचार करून प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याची परवानगी द्यावी, या आशयाचे पत्र मुकेश यांनी आरोग्य सेवेला दिले होते, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली. (प्रतिनिधी)
मुकेश शहा यांचे आरोग्यसेवेला पत्र
By admin | Updated: September 20, 2016 04:21 IST