- विशेष प्रतिनिधीमुंबई - शिवसेना-भाजपा युतीच्या सत्ताकाळात सुमारे दोन दशकांपूर्वी घोटाळ्यांमुळे गाजलेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी)ला पुन्हा एकदा घोटाळ्यांनी घेरले आहे. डमी उमेदवार बसवून एमपीएससीची परीक्षा पास केलेले अनेक जण क्लास वन अधिकारी झाले आहेत. त्यांना नोकरीतून बडतर्फ करा, अशी जोरदार मागणी करीत विरोधी पक्ष सदस्यांनी आज विधानसभेत गदारोळ केला.परीक्षेला डमी उमेदवार बसवायचे आणि त्या बदल्यात पैसे घेणाºयांचे रॅकेटच कार्यरत आहे. या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी केली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रश्नी स्थगन प्रस्ताव स्वीकारावा आणि सर्व कामकाज बाजूला ठेवून सभागृहात चर्चा करावी, अशी मागणी केली. अध्यक्षांनी ती फेटाळल्यानंतर निषेध म्हणून विरोधकांनी सभात्याग केला.जयंत पाटील यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना दिली होती. लाखो तरुण एमपीएससीची परीक्षा देत असतात. गोरगरीब घरातील जवळजवळ दरवर्षी ८ ते १० लाख मुले परीक्षा देत असतात. या परीक्षेमध्ये काही लोक २० लाख रुपये देऊन डमी उमेदवाराच्या माध्यमातून पास होऊन शासकीय सेवेत दाखल होत आहेत. डमी उमेदवार बसून बोगस लोक सेवेत येणार असतील, तर हुशार मुलांवर अन्याय होणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले. हा घोटाळा योगेश जाधव नावाच्या तरुणाने उघडकीस आणला आहे. त्यासंदर्भात योगेशने पंतप्रधानांना अडीच हजार मेल पाठवले आहेत. २०१५ दरम्यान सुरू झालेल्या या प्रक्रियेनंतर १६ जून २०१६ रोजी एफआयआर दाखल करण्यात आला. आजही महाराष्ट्रात डमी म्हणून बसलेले दोनएकशे उमेदवार मोकळे फिरत आहेत. एसआयटीच्या म्हणण्यानुसार १६ जणांना अटक केलेली आहे. या प्रकारामुळे राज्यातील युवकांमध्ये तीव्र असंतोष असल्याचे जयंत पाटील म्हणाले.एमपीएससी परीक्षेत घोटाळाएमपीएससी परीक्षेत मोठा घोटाळा झाला आहे. दीड लाख पदे रिक्त असताना सरकार ५०-६० जागांच्या भरती काढते. त्यातही असे प्रकार घडत आहेत. यावर सरकारने तत्काळ निवेदन करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी या वेळी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येऊन घोषणाबाजी केली.
एमपीएससी पुन्हा वादाच्या भोव-यात, डमी उमेदवार देत आहेत क्लास वन पदाच्या परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 04:11 IST