सातारा : राज्याचे कृषिमंत्रीमाणिकराव कोकाटे हे सतत वादग्रस्त ठरत असल्याने पक्ष, तसेच महायुतीची प्रतिमा मलिन होत चालली आहे. यामुळे कोकाटे यांच्याकडून कृषी खाते काढून ते मदत व पुनर्वसनमंत्रीमकरंद पाटील यांच्याकडे देण्याबाबत हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळत आहे. दोघांच्या खात्यात अदलाबदलाच्या चर्चेने जिल्ह्याला कृषीसारखे आणखी एक वजनदार खाते मिळू शकते.राज्यात मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात विधानसभेची निवडणूक झाली होती. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी मंत्रिपद देण्यात आले; पण मागील सात महिन्यांत त्यांनी अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्ये केली. यामुळे पक्षाची अडचण झाली. अशातच नुकताच त्यांचा विधिमंडळ अधिवेशनात मोबाइलवर रम्मी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले आहे. विरोधकांनीही राजीनाम्याची मागणी केली आहे.
खात्यात अदलाबदलाची चर्चा..कोकाटे यांच्याकडून कृषी मंत्रिपद काढले जाण्याचा अंदाज वर्तविला जातोय. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्याकडे कृषी मंत्रिपद येऊ शकते, तर पाटील यांचे खाते कोकाटे यांना देण्याचीही शक्यता आहे. याबाबत मंत्री मकरंद पाटील यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी मंत्रिपद बदलाच्या हालचालींविषयी नकार दिला, पण पक्षाचे आदेश माझ्यासाठी शिरसावंद्य असतील, असे ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
कोकाटे यांना तूर्त अभय ?मुंबई : वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विधान परिषदेत रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यांच्या राजकीय भवितव्याची चर्चा सुरू झाली असली तरी सध्यातरी पक्षाकडून त्यांना अभय दिल्याची चर्चा आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कोकाटे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा अथवा त्यांचे खातेबदल याबाबत पक्षात कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगितले.