मनपा उभारणार स्वत:ची प्रयोगशाळा नागपूर : जेथे घाण, कचऱ्याचे ढिगारे, सांडपाण्याचे डबके तीच डास उत्पत्तीची ठिकाणे असे साधारणत: मानले जाते. मात्र, डेंग्यूसाठी जबाबदार असलेल्या एडीज डासाच्या बाबतीत असे नाही. मात्र, डेंग्यूचे डास स्वच्छ पाण्यात वाढतात व दिवसा लोकांना चावा घेतात. महापालिकेने नुकतेच घरोघरी जाऊन केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. एवढेच नव्हे तर डेंग्यूचे सर्वाधिक डास व रुग्ण पॉश वस्त्यांमध्येच आढळून आले आहेत. महापौर प्रवीण दटके यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत बैठक झाली. तीत या संबंधीचा खुलासा अधिकाऱ्यांनी केला. बैठकीत उपमहापौर मुन्ना पोकुलवार, आरोग्य सभापती रमेश सिंगारे, अपर आयुक्त हेमंत पवार, उपायुक्त संजय काकडे, स्वास्थ्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना रमेश सिंगारे यांनी सांगितले की, राज्य सरकारने डेंग्यूबाबत १२ शहरांना नोटीस जारी केली आहे. यात नागपूरचा समावेश नाही. असे असले तरी डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी पावले उचलली जात आहेत. जानेवारी ते आजवर २७७८ संदिग्धांचे नमुने तपासण्यात आले. यापैकी २९३ जणांना डेंग्यू असल्याचे स्पष्ट झाले. ४ जणांचा डेंग्यूमुळे मृत्य झाला. विमानतळ, वायुसेना नगर, म्हाळगी नगर, अजनी क्वॉर्टर्स, वाठोडा, गांधीबाग, शांतिनगर, पारडी, नारी, जरीपटका येथे डेंग्यूचा प्रकोप जास्त आहे. डेंग्यूवर नियंत्रणासाठी जून महिन्यापासूनच पावले उचलली जात आहेत. सहा महिन्यात ४ लाख ८८ हजार ९३१ घरांची तपासणी करण्यात आली. यापैकी २ हजार ९७७ घरांमध्ये डेंग्यू डासांची लादी आढळून आली. ७३० निरुपयोगी विहिरींपैकी ३३९ विहिरींमध्ये गप्पी मासे सोडण्यात आले. ३ हजार १९६ खुले भूखंडधारकांना नोटीस बजावण्यात आली. याशिवाय फवारणी करण्यात आली. ३१२ भूखंडांवर साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडण्यात आले. (प्रतिनिधी)
पॉश वस्त्यांमध्येच डेंग्यूचे सर्वाधिक डास
By admin | Updated: November 20, 2014 01:05 IST