ठाणे : ऐन सकाळी गर्दीच्या वेळी डोंबिवली रेल्वे स्थानकावर मच्छी का पानी म्हणत हमालांची धावपळ सुरू असते. डोंबिवली पश्चिमेला अगदी रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर मच्छी मार्केट आहे. कल्याण-डोंबिवलीतील मासे खाणाऱ्या खवय्यांना तृप्त करण्यासाठी कल्याण-डोंबिवलीत ससून डॉकमधून येथील विक्रेते मासे आणतात. येथे आणल्यानंतर मासे ताजे राहण्यासाठी मात्र या विके्रत्यांना जीवाचा आटापिटा करावा लागतो. अनेकदा ताजे मासे ठेवण्याची सोय न झाल्यास मासे फेकून देण्याची वेळ या विक्रेत्यांवर येते. आलेले ग्राहक केवळ ताजे मासे नसल्याने घेणे टाळतात. डोंबिवलीचे मच्छी मार्केट हे घनश्याम गुप्ते हे प्रथम सरपंच होते तेव्हापासूनचे आहे, असे काहींचे म्हणणे आहे. तर, जाणकारांच्या मते ८० हून अधिक वर्षे जुने, असे हे मार्केट आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेने या बाजाराकडे दुर्लक्ष केल्याने दिवसेंदिवस त्याची दुरवस्था अधिकच होत चालली आहे. कितीही स्वच्छता राखली तरीही अस्वच्छताच दिसते. येथून ये-जा करताना नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. नाकावर रुमाल ठेवल्याशिवाय जाणे कठीण होते. एकूणच अशा परिस्थितीत डोंबिवलीचे मच्छी मार्केट कधी कात टाकणार, असा सवाल कल्याण-डोंबिवलीकर नागरिकांना पडला आहे. अशा अस्वच्छ, दुर्गंधी येत असलेल्या मार्केटमध्ये येण्यापेक्षा चौकाचौकांत माशांची विक्री करणाऱ्या विके्रत्यांकडून उघड्यावरील मासळी विकत घेण्याशिवाय येथील नागरिकांना पर्याय राहिलेला नाही. येथे ग्राहक आहेत, परंतु अद्ययावत मासळी बाजार नसल्याने रविवारी भल्या पहाटे उठून वसई गाठत तेथून नागरिकांना मासे आणावे लागत आहेत. सध्याच्या मार्केटमध्ये कोल्ड स्टोअरेजची सुविधा नाही, स्वच्छतेसाठी मुबलक पाणी नाही. या अशा परिस्थितीमुळे ग्राहक येथे येण्याचे शक्यतो टाळतात.अद्ययावत मार्केट होण्यासाठी माजी नगरसेवक दिलीप भोईर यांनी याबाबतचा सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांनी १९ मे २०११ रोजी महापालिकेला पत्र पाठवले. त्या पत्रात महापालिकेने कल्याणसह डोंबिवली पश्चिमेच्या मच्छी मार्केटच्या पुन:र्बांधणीबाबतचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला होता. तो त्यांनी सरकारच्या मत्स्य विभागाकडेही पाठवला होता. या प्रस्तावाला महासभेची मंजुरी मिळावी, असेही त्यांनी सांगितले होते. तो विषय पटलावर घ्यावा, अशी विनंतीही केली होती. या प्रस्तावाला मस्त्य, महासभेची मंजुरी मिळाली. मात्र, प्रत्यक्षात कामाला सुरुवात न झाल्याने भोईर यांनी महापालिकेला पुन्हा ७ मे २०१२ रोजी स्मरणपत्र पाठवले. मंजुरीनंतरही कामाला सुरुवात होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
मच्छी मार्केट कागदावरच!
By admin | Updated: May 30, 2016 02:30 IST