मुंबई : लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांना माकडाचा धाक दाखवत त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या तीन महिलांना कुर्ला आरपीएफने अटक केली.प्रवाशांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली असून, महिलांच्या ताब्यात असलेल्या तीन माकडांची पोलिसांनी सुटका केली आहे.गेल्या काही महिन्यांपासून मध्य रेल्वेमार्गावरील कुर्ला ते मुलुंड या स्थानकांदरम्यान काही महिला माकडांच्या मदतीने प्रवाशांकडून पैसे उकळत असल्याच्या तक्रारी आरपीएफकडे दाखल झाल्या होत्या. ऐन गर्दीच्या वेळी या महिला माकडांसह लोकलमधील प्रवाशांकडून भीक मागत होत्या. महत्त्वाचे म्हणजे एखाद्या प्रवाशाने पैसे दिले नाही, तर या महिला त्यांच्यावर माकड सोडत. परिणामी, घाबरलेले प्रवासी पैसे काढून देत होते. कित्येक दिवसांपासून हा प्रकार घडत असल्याने यासंबंधी तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी लोकलमधील गस्त वाढवली. शनिवारी सकाळी या महिला ठाण्याहून सीएसटीच्या दिशेने प्रवास करीत होत्या. गस्तीवर असलेल्या पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी कुर्ला रेल्वे स्थानकात सापळा रचून त्यांना अटक केली; शिवाय तीन माकडांची सुटका करत त्यांना वन अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. (प्रतिनिधी)
माकडांच्या धाकाने लुटणारे अटकेत
By admin | Updated: July 31, 2016 04:59 IST