नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्वात लोकप्रिय नेते असून, त्यांना जनतेने निवडून दिले आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदींच्या लोकप्रियतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणा-या शिवसेनेला शुक्रवारी टोला लगावला.नागपूरमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. शिवसेनेच्या मुखपत्रातून मोदींवर होणाऱ्या टीकेच्या संदर्भात त्यांना विचारले असता ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची मैत्री २५ वर्षे जुनी आहे. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींमुळे दोन्ही पक्षांत वाद होणार नाही. राज्यात स्वाईन फ्लूमुळे दगावणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आरोग्य मंत्री याकडे लक्ष ठेवून आहेत. स्वाईन फ्लूवर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहे.राज्यातील काही भागांत गारपीट आणि अवकाळी पावसामुळे पीक हानी झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत याचे प्रमाण कमी असले तरीही सरकारने यासंदर्भात आढावा घेतला असून, योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत, असे फडणवीस म्हणाले. शनिवारी मोदी बारामतीला भेट देणार आहेत. याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, राज्याच्या विकासाबाबत मोदी नेहमीच विचार करतात. त्याच अनुषंगाने हा दौरा आहे. (प्रतिनिधी)
मोदीच देशातील सर्वात लोकप्रिय नेते
By admin | Updated: February 14, 2015 03:53 IST