अलिबाग : कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आदिवासी विभागांतर्गत असलेल्या शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या मोफत आरोग्य तपासणीसाठी मोबाइल हेल्थ युनिट सुरू करण्याकरिता राज्याचा आदिवासी विकास विभाग आणि उर्वी अशोक पिरॅमल फाऊंडेशन या संस्थेबरोबर सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार यातील पहिले मोबाइल हेल्थ युनिट कर्जत तालुक्यामध्ये पाथरज येथे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते नुकतेच कार्यान्वित करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर आता मोबाइल हेल्थ युनिट कोकणातील उर्वरित जिल्ह्यात कार्यान्वित करण्याचे नियोजन आदिवासी विकास विभागाने केले आहे.आदिवासींच्या कल्याणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी १९८३ मध्ये स्वतंत्र आदिवासी विकास विभागाची स्थापना करण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागांतर्गत ठाणे, नाशिक, नागपूर व अमरावती येथे चार अपर आयुक्त आणि २९ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालये असून त्यांच्या मार्फत मागासवर्गीय कल्याणाच्या राज्य व केंद्र शासनाच्या योजनांची अंमलबजावणी होते. ठाणे अपर आयुक्त कार्यालयांतर्गत रायगड जिल्ह्यातील पेण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय आहे. पेण प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांचा आहे. सन २०११ च्या जनगणनेप्रमाणे रायगड जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्या ३ लाख ५ हजार १२५ असून जिल्ह्याच्या एकू ण लोकसंख्येच्या ११.५८ टक्के आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्या २० हजार ३७४ असून एकूण लोकसंख्येच्या १.२६ टक्के आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्या ६ हजार ९७६ असून, जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या ०.८२ टक्के आहे. (विशेष प्रतिनिधी)>१३ हजार ९९ आदिवासी विद्यार्थ्यांची मोफत तपासणीपेण प्रकल्प कार्यालयांतर्गत कोकणात १६ शासकीय आश्रमशाळा, ११ अनुदानित आश्रमशाळा, १३ शासकीय वसतिगृह ,४ इंग्रजी माध्यमाच्या शाळा व १ सैनिकी शाळा कार्यरत आहेत. १६ शासकीय आश्रमशाळांमध्ये ५ हजार ६६७ विद्यार्थी, ११ अनुदानित आश्रमशाळांमध्ये ५ हजार २५० विद्यार्थी, चार इंग्रजी माध्यमाच्या शाळामध्ये ९१७ विद्यार्थी, सैनिकी शाळेमध्ये १६३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच १३ शासकीय वसतिगृहातील १ हजार १०२ विद्यार्थी अशा एकूण १३ हजार ०९९ आदिवासी विद्यार्थ्यांना या मोबाइल हेल्थ युनिट योजनेचा लाभ मिळणार आहे.
आरोग्य तपासणीसाठी मोबाइल हेल्थ युनिट
By admin | Updated: October 8, 2016 04:24 IST