मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत कार्यकर्त्यांना संबोधित केलं आहे. कुंभमेळा, नद्यांचं प्रदूषण अशा विविध मुद्द्यावर त्यांनी भाष्य केलं आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून जोरदार निशाणा साधला. "चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आता विकी कौशल मेल्यावर कळलं का? व्हॉट्सएपवर इतिहास वाचता येत नाही. इतिहास वाचण्यासाठी पुस्तकात डोकं घालायला लागेल. कोणीही बोलायला लागलं आहे. विधानसभेतही बोलतात."
"औरंगजेबचा जन्म गुजरातमधला. इतिहासाशी संबंध नाही ते हे सर्व बोलत आहेत. त्यांना राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे. त्यांना ना संभाजी महाराजांशी काही कर्तव्य आहे ना औरंगजेबाशी. त्यांना तुमची माथी भडकवायची आहेत. हिंद प्रांतात अतिशय कडवड आणि प्रभावी स्वप्न ज्या व्यक्तीला पडलं त्या आमच्या जिजाऊसाहेब ... हे त्यांचं स्वप्न. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे हिंद प्रांतावर केलेला संस्कार, एक चमत्कार आहे. ती एक विलक्षण घटना आहे. एक विचार आहे. तो विचार जन्माला येण्याआधी काय परिस्थिती होती? सर्व जातीचे लोक कोणा ना कोणाकडे होतेच ना कामाला? तो काळ होता, परिस्थिती तशी होती."
"शिवाजी महाराजांचे वडील आदिलशाहीत होते, नंतर निजामशाहीत गेले ना. तो काळ वेगळा होता, त्यांनी का असे निर्णय घेतले? या सर्व लोकांना जातीतून का पाहत आहात? अफजलखानाचा वकील कुळकर्णी नावाचा ब्राम्हण होता. शिवाजी महाराजांचा वकीलही ब्राम्हणच होता. तेव्हा सगळी माणसं कोणा ना कोणाकडे कामाला होती. इतिहासातील प्रत्येक गोष्ट कागदावर लिहिलेली नाही. त्यावेळी परिस्थितीत काय निर्णय घेतले असतील तर आपल्याला काय माहीत. चारशे वर्षांच्या इतिहासावर आपण आज भांडतोय. कशा अंगाने इतिहास पाहायचा हे आपण बघणार आहोत की नाहीत?" असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.
'आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला, इथेच गाडला'; राज ठाकरे म्हणाले औरंजेबाच्या कबरीवर बोर्ड लिहा
औरंगजेब एकही लढाई जिंकू शकत नव्हता. छत्रपती शिवाजी, संभाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर तो दिल्लीला गेला असता. मोठा राजा होता. पण त्याला शिवाजी नावाची भीती वाटत होती. त्यामुळे तो दोन अडीच जिल्ह्यांसाठी इथेच थांबला होता. जी कबर आहे ना, ती सजवलेली काढून टाका तिथे फक्त कबर दिसुद्या. तिथे एक मोठा बोर्ड लावा. आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला, हा आमचा इतिहास असल्याचं राज ठाकरे म्हणाले.