महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १९ वा वर्धापन दिन आहे. याच निमित्ताने चिंचवडमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राज ठाकरेंनी जोरदार भाषण केलं. गुढीपाडव्याला दांडपट्टा फिरवणार असं म्हटलं आहे. यासोबतच जी काही कामं सुरू आहेत त्याबद्दल गुढीपाडव्याला सविस्तर बोलणार असल्याचंही सांगितलं आहे.
"मी आज फार काही बोलणार नाही. २० दिवसांवर गुढीपाडव्याचा मेळावा आहे. मी तिकडे दांडपट्टा फिरवणार आहे तर मग आता चाकू आणि सुरे कशाला काढू? सदानंद मोरेंनी आजच्या परिस्थितीवर बोलावं ही माझी अपेक्षा होती. महाराष्ट्राचा जो चिखल झालाय तो फक्त राजकारणासाठी झाला आहे. राजकीय मतं मिळवण्यासाठी तुमची आपापसात डोकी फोडून घेत आहेत, आग लावत आहेत आणि हे आमच्या लोकांना समजत नाही" असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
"एक छोटीशी गोष्ट सांगतो, प्रभू रामचंद्रांना जेव्हा वनवास झाला, तेव्हा त्यांच्याबरोबर लक्ष्मण, सीतामाई सगळ्यांना घेऊन ते निघाले. नाशिकमध्ये आले. १४ वर्षांचा वनवास त्यांनी भोगला. मध्यंतरीच्या काळात रावण आला सीतामाईला पळवून घेऊन गेला. मग वाली आणि सुग्रीव भेटले. त्यानंतर वानरसेना बरोबर घेतली. सेतू बांधला श्रीलंकेत गेले, तिथे रावणाचा वध केला. या सगळ्या गोष्टी १४ वर्षात त्यांनी केल्या."
"आपण वांद्रे वरळी सी लिंक बांधायला १४ वर्षे घेतली आहेत. जी काही कामं सुरू आहेत ना त्याबद्दल मी सविस्तर गुढीपाडव्याला बोलणार आहेच. मग जातीपातीचे विषय, सोशल मीडियावर टाळकी भडकवणं हे जाणूनबुजून उद्योग सुरू आहेत" असं राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.