लोकमत न्यूज नेटवर्कछत्रपती संभाजीनगर : पैशांसाठी काही अडले, असे समजण्याचे काहीच कारण नाही. पैसे देणारे आम्हीच आहोत. ‘आजकल हमारा नाम बहुत चल रहा है.’ त्यामुळे पैशांची चिंता नाही. एखादी बॅग तुमच्याकडे (अधिष्ठाता) पाठवून देऊ, असे पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले.
शासकीय कर्करोग रुग्णालयात (राज्य कर्करोग संस्था) शनिवारी डिजिटल मॅमोग्राफी यंत्राच्या उद्घाटन समारंभप्रसंगी संजय शिरसाट बोलत होते. यावेळी इतर मागास वर्ग कल्याण मंत्री अतुल सावे, आ. संजय केणेकर, माजी महापौर नंदकुमार घोडेले, सहसंचालक डॉ. शिल्पा दोमकुंडवार, अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, डाॅ. अंजली वासडीकर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी घाटी रुग्णालय, शासकीय कर्करोग रुग्णालयातील वॉर्ड, स्वच्छतागृहांची देखभाल-दुरुस्ती आणि लहान बांधकामांसाठी निधीची मागणी केली. त्यावर वरील टिपण्णी करीत शिरसाट यांनी घाटी रुग्णालयाला निधी दिला जाईल, असे सांगितले.
आ. संजय केणेकरांचा काढता पाय कार्यक्रमापूर्वी काही वेळ आधी हजेरी लावून आ. केणेकर यांनी रुग्णालयातून काढता पाय घेतला.संजय शिरसाट यांचे वाहन येताच आ. केणेकर दार उघडण्यासाठी पुढे सरसावल्यावरूनही रुग्णालयात चर्चा सुरू होती.
राजेंद्र दर्डा यांंनी केलेल्या प्रयत्नांचा सावेंकडून उल्लेख
राजेंद्र दर्डा हे मंत्रिपदी असताना त्यांनी रुग्णालयासाठी प्रयत्न केले. त्यांनी शासकीय कर्करोग रुग्णालयासाठी पाठपुरावा केला. आता या रुग्णालयात सर्व सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे अतुल सावे म्हणाले.