मुंबई : ज्यांचे खाते काढून आपल्याला मिळाले त्यांच्याच साक्षीने मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारण्याची भूमिका घेत कॅबिनेट मंत्री प्रा. राम शिंदे यांनी जलसंधारण खात्याचा पदभार अद्याप स्वीकारलेला नाही. मतदारसंघातील समीकरणांमुळेच मंत्रिपदाची शपथ घेऊनही शिंदे ते स्वीकारत नसल्याचे म्हटले जाते. आजवर गृह राज्यमंत्री असलेले शिंदे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बढती देत कॅबिनेट मंत्री केले आणि पंकजा मुंडे यांच्याकडे असलेल्या तीन खात्यांपैकी जलसंधारण खाते हे शिंदेंकडे सोपविले. खातेवाटप जाहीर होऊन आज तीन दिवस झाले तरी शिंदे यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही. पंकजा मुंडे सध्या सिंगापूरमध्ये आहेत. जलसंधारण खाते काढून घेतल्याबरोबर त्यांनी, ‘आपण या खात्याचे मंत्रीच नाही तर सिंगापूरमध्ये आयोजित पाणी परिषदेला उपस्थित राहण्यात औचित्य नाही’, असे नाराजीचे टिष्ट्वट केले होते. त्यावर लगेच मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज देत, वरिष्ठ मंत्री या नात्याने सरकारच्या प्रतिनिधी म्हणून परिषदेला उपस्थित राहा, असा आदेश दिला होता. त्यानंतर कुठे पंकजा परिषदेत सहभागी झाल्या. शनिवारच्या विस्तारात मंत्री झालेल्यांपैकी दहा जणांनी पदभार स्वीकारला असून आपापल्या विभागाच्या बैठका घेणेदेखील सुरू केले आहे. मात्र शिंदे हे पंकजा मुंडे यांच्या प्रतीक्षेत आहेत. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे एकेकाळी कट्टर समर्थक असलेल्या शिंदे यांचा कर्जत-जामखेड (जि.अहमदनगर) विधानसभा मतदारसंघ मुंडेंचा बालेकिल्ला असलेला बीड जिल्हा लागूनच आहे. शिवाय, या मतदारसंघात वंजारी समाजाची मते मोठ्या प्रमाणात आहेत. पंकजा यांचे जलसंधारण खाते काढून घेतल्याने त्यांचे समर्थक नाराज असून त्यांनी निषेधार्थ मुख्यमंत्र्यांचे पुतळेही जाळले आहेत. पंकजा यांचे खाते राम शिंदेंमुळे गेले, अशी काहीशी भावनादेखील आहे. हे लक्षात घेता पंकजा परत आल्यानंतर त्यांच्या साक्षीने आणि अनुमतीने पदभार स्वीकारू, अशी भूमिका शिंदे यांनी घेतली आहे. पंकजा यांच्या अनुपस्थितीत आपण परस्पर पदभार स्वीकारला तर वंजारी समाज आणि अन्य मुंडे समर्थकांची नाराजी ओढावून घेतल्यासारखे होईल, असे वाटत असल्यानेच शिंदे पंकजा यांची प्रतीक्षा करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. पंकजा या १४ जुलै रोजी परतणार असून १५ जुलै रोजी त्या पत्रकार परिषद घेणार आहेत. (विशेष प्रतिनिधी)
मंत्री राम शिंदे खात्याचा पदभार स्वीकारेनात
By admin | Updated: July 13, 2016 04:23 IST